परळी : तालुक्यात कोरोना विक्राळ रुप धारण करत आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर आपलाच हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले.
कोविडसदृश्य ताप आला तर सलाईन घेऊन पेशंट न्यूमोनिया होण्यासाठी आमंत्रण देत आहेत, असे तज्ज्ञ डॉक्टरांच्या वेबिनारमध्ये निदर्शनास आले आहे. स्वतःच्या व आपल्या जवळच्या लोकांच्या आरोग्याशी अजिबात खेळू नका. यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींची मदत घ्या अन्यथा परिस्थिती अजून गंभीर होईल, असा इशाराही डॉ. मुंडे यांनी दिला.
अंगात कणकण आणि ताप असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवा.
स्वतः विलग होऊन इतरांना सुरक्षित करण्यास प्राधान्य द्या.
घरी पल्स ऑक्सिमीटर असेल तर दररोज सहा मिनिटे चालून ऑक्सिजन सॅच्युरेशन तपासा. जर ऑक्सिजन लेव्हल ९० ते ९५पेक्षा कमी असेल तर त्वरित आरटीपीसीआर, सीबीसी किंवा सीटी स्कॅन करुन घ्या.
वेळेवर सकस अन्न सेवन करा, अधिकाधिक पाणी प्या, जास्तीत जास्त आराम करा. जर आपण वैद्यकीय निकषांत बसत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्वरित लस घ्या.
प्रसंग बाका आहे. स्वतःला व आपल्या हलगर्जीपणामुळे आप्तेष्टांना संकटात टाकू नका, असे कळकळीचे आवाहन धनंजय मुंडे आरोग्यमित्र योजनेचे संकल्पक डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.