अंबाजोगाई : ‘घेऊ नको रे फाशी ,जग राहिल उपाशी’ ही घोषणा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने निघालेल्या जागर दिंडीतील प्रमुख घोषणा ठरली. विद्यार्थी व युवकांनी या घोषणेने शहर दणाणून सोडले. जागरदिंडीत सहभागी झालेल्या सर्वच शाळा व महाविद्यालयांनी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून कलाकृती सादर केल्या. यातून शेतकर्यांच्या जीवनातील दु:ख त्यांच्या समस्या, आत्महत्या याबद्दलची संवेदना प्रकट झाल्याने अन्नदाता सुखी भव या संकल्पनेतून निघालेल्या या जागरदिंडीने शेतकर्यांच्या प्रश्नांबद्दल असणार्या संवेदना जागृत केल्या.
बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग व मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने येथे आयोजित ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाची सुरुवात २४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता शिवाजी चौकात जागर दिंडीने झाली. दिंडीत विविध शाळांमधील पाच हजार विद्यार्थी-शिक्षकांनी सहभाग घेतला.
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, मसाप अध्यक्ष कौतिकराव ठालेपाटील, सचिव दादा गोरे, उपाध्यक्ष किरण सागर, कोषाध्यक्ष भास्कर बडे, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या उपसचीव सुवर्णा खरात, जि. प. मा. विभागाचे शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी भावना राजनोर, उपशिक्षणाधिकारी (लातूर) शशिकांत हिंगोणेकर, व्यंकटेश गायकवाड, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संमेलनाच्या स्वागत समितीचे उपाध्यक्ष आंदोलनाचे प्रमुख अमर हबीब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशातील शेतकर्यांच्या सन्मानार्थ ‘अन्नदाता सुखी भव’ हा संदेश या जागर दिंडीतून देण्यात आला. दिंडीत योगेश्वरी महाविद्यालय, खोलेश्वर, यशवंतराव चव्हाण, योगेश्वरी नूतन, खोलेश्वर, व्यंकटेश , जोधाप्रसाद, नेताजी, मन्सूर अली, मिल्लिया, डॉ. अब्दुल एकबाल, बालनिकेतन, मुकुंदराज, ज्ञानसागर गुरुकुल, जिल्हा परिषद माध्यमिक व प्राथमिक शाळा, यासह विविध शाळांमधील हजारोंवर विद्यार्थी सहभागी होते. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी शेतकर्यांना आत्महत्यापासून परावृत्त करणारे, पर्यावरण रक्षण करणारे, एकात्मतेचा संदेश देणारे, सर्व धर्म समभाव चा संदेश देणारे विविध उपक्रम सादर केले. या जागर दिंडीत व्यंकटेश विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे जवळपास पाचशे विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला असून शिवकालीन महाराष्ट्राचे दर्शन, विविध राज्यातील नागरिकांच्या वेशभूषा, वैज्ञानिक, वारकरी, संतांच्या वेशभूषेतील पथक त्यांनी सादर केले.
जागर दिंडीत विजय अंजान व त्यांच्या संचाने शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सादर केलेले पथनाट्याचे सादरीकरण केले आत्महत्येनंतर त्या शेतकर्याच्या कुटुंबियाची अवस्था या पथनाट्यातून मांडण्यात आली. तर योगेश्वरी महाविद्यालयाच्या पथकाने हुंडाबळी व समाजातील अनिष्ट प्रथांवर आपले पथनाट्य सादर केले.