गोपीनाथ गड ( बीड ) : गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. कृष्णा खोऱ्याचे हक्काचे पाणी मराठवाड्यात मिळणे आणि वाटर ग्रीडची अमलबजावणी ही कामे प्राधान्याने करू. तसेच राज्यातील दुष्काळाची काळी करू नका त्यासाठी शासनाचा खजिना रिता करू अशी ग्वाही मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ गड येथे दिली.
परळी, तालुक्यातील पांगरी येथील गोपिनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृती दिनी समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी आज सकाळपासूनच अनुयायांची गर्दी झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठवाड्यातील सेना-भाजप युतीच्या नवनियुक्त खासदारांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील भाजपच्या यशात गोपीनाथ मुंडे यांचा वाटा आहे. मुंडे- महाजन यांच्या पायाभरणीमुळे राज्यात पक्षाला हे यश मिळाले. आम्हाला मुंडे साहेबांनी घडवले आहे. तसेच पंकजा आणि प्रीतम मुंडे या सामन्यांसाठी काम करत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकारत आहेत असेही ते म्हणाले.
मराठवाडा दुष्काळ मुक्त करू गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल.यासाठी वाटर ग्रीड आणि कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्यात आणणे असे प्रकल्प मराठवाड्यात राबविण्यात येणार आहेत. सध्या भीषण दुष्काळ पडला असून याला घाबरण्याचे कारण नाही, दुष्काळ निवारणासाठी शासनाच्या खजिना रिता करू अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.