रिॲलिटी चेक
सोमनाथ खताळ
बीड : सहकाऱ्याच्या छातीत दुखतंय. रुग्ण गाडीच्या खाली उतरू शकत नाही. लवकर डॉक्टरला बोलवा, असे म्हणताच परिचारिकेने डॉक्टरला फोन केला आणि अवघ्या ६ मिनिटांत डॉक्टर पोहचले. डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे रुग्णांमधून समाधान व्यक्त होत आहे. ‘लोकमत’ने शनिवारी दुपारी ३.३१ वाजता राजुरी प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी केली असता ही तत्परता समोर आली.
बीडपासून अवघ्या १० किमी अंतरावर राजुरी गाव आहे. येथे सुसज्ज असे आरोग्य केंद्र आहे. येथे डॉ. बेग व डॉ. दत्ता राऊत असे दोन वैद्यकीय अधिकारी आहेत. परंतु डॉ. बेग यांच्याकडे मलेरिया विभागाचा अतिरिक्त पदभार असल्याने ते बीडलाच असतात. आठवड्यापूर्वी चऱ्हाटा येथील डॉ. रोशन गायकवाड यांना येथे कर्तव्य बजावण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. असे असले तरी नियमित एकच वैद्यकीय अधिकारी येथे असतात. शनिवारी काही आरोग्य केंद्रांचे डॉक्टर, कर्मचारी दुपारनंतर आरोग्य केंद्रात फिरकत नाहीत. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने अचानक तपासणी केली. यात एका मित्राच्या छातीत दुखत आहे, असे सांगून डॉक्टरांना बोलावण्यास सांगितले. कर्मचारी अशोक डावकर यांनी परिचारिकांना भेटण्यास सांगितले. कदम व वाघमोडे या परिचारिकांना सांगताच त्यांनी तत्काळ डॉक्टरांना फोन करून बोलावले. तसेच तोपर्यंत रुग्णाला आतमध्ये घ्या, आम्ही तपासणी करतो, असा दिलासा दिला. फोन केल्यानंतर अवघ्या ६ मिनिटांत डॉ. राऊत हे केंद्रात दाखल झाले. सर्व प्रकार समजल्यावर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त होत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट यांच्याकडूनही वारंवार मार्गदर्शन केले जात असल्याचे डॉ. राऊत म्हणाले.
कोट
आलेल्या प्रत्येक रुग्णाला सेवा दिली जाते. ओपीडी वेळेत तर हजर असतोच; परंतु इतर वेळेतही अवघ्या १० मिनिटांत आरोग्य केंद्रात पाेहचू, अशा ठिकाणीच आम्ही असतो. माझ्यासह आमचे सर्व कर्मचारी तत्पर असतात. आरोग्य सेवेत आम्ही हलगर्जी करत नाहीत.
डॉ. दत्ता राऊत
वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ. केंद्र, राजुरी
असा असतो नियमित स्टाफ
१ डॉक्टर १ औषध निर्माता, २ परिचारिका, २ शिपाई