लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कर्तव्यावर जाणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात डॉक्टर संघटनेने निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर चौकशीसाठी समितीही नियुक्त केली. परंतु, ऐनवेळी संबंधित डॉक्टरने तक्रार देण्यास असमर्थता दर्शविल्याने संघटनेने आंदोलनाचे निवेदन मागे घेतले. त्यामुळे चौकशीच झाली नाही. तर दुसऱ्या बाजूला डॉक्टरांचा संताप आणि चर्चा केवळ सोशल मीडियापुरतीच राहिली. आता हे प्रकरण शांत झाले आहे.
आष्टी तालुक्यातील टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल वनवे यांची गुरूवारी कोविड सेंटरला ड्युटी होती. त्यासाठी ते बुधवारी रात्रीच दुचाकीवरून आष्टीकडे जात होते. याचवेळी त्यांना चऱ्हाटा फाटा येथे पोलिसांनी अडवले. यावेळी त्यांना मारहाण झाली होती. आपण ओळखपत्र दाखवूनही मारहाण केल्याचा आरोप डॉ. वनवे यांनी केला होता. त्यानंतर सर्व डॉक्टर व त्यांच्या संघटनांनी कामबंद आंदोलन करू, असा इशारा दिला होता. रात्रभर जिल्हाधिकारी यांच्यासह प्रशासनाला वेठीस धरले होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडते की काय? असा प्रश्न होता. परंतु, चौकशी समिती नियुक्त केल्याने हे सर्व शांत झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डॉक्टरने तक्रार देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे संघटनेवर आपले कामबंद आंदोलन मागे घेण्याची नामुष्की ओढवली. ज्या निवेदनाच्या आधारे चौकशी समिती नियुक्त केली होती, ते निवेदनच मागे घेतल्याने चौकशीही थांबविण्यात आली. त्यामुळे हे सर्वच प्रकरण शांत झाले आहे. संबंधित डॉक्टरने दबावापोटी तक्रार दिली नसल्याची चर्चा आहे. याबाबत डॉ. वनवे यांच्याशी वारंवार संपर्क केला. परंतु, त्यांनी भ्रमणध्वणीला प्रतिसाद दिला नाही.
सोशल मीडियावरील चर्चा शांत
ज्यादिवशी डॉ. वनवे यांना मारहाण झाली, त्याचदिवशी सरकारी डॉक्टरांच्या सोशल मीडिया ग्रुपवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. यात काहींनी संघटना व पदाधिकाऱ्यांविरोधात रोष व्यक्त केला. काहीजण अंतर्गत निर्णय न पटल्याने बैठकीतून बाहेरही पडले होते. यावेळी आंदोलनासह आणखी बरेच इशारे देणाऱ्या डॉक्टरांची चर्चा केवळ सोशल मीडियापुरतीच मर्यादीत राहिली आहे.
....
या प्रकरणात डॉक्टरांच्या संघटनेने कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. याच निवेदनावरून चौकशी सुरू केली होती. परंतु, याच संघटनेने नंतर संबंधित डॉक्टरने तक्रार देण्यास असमर्थता दर्शविल्याने आंदोलन मागे घेत असल्याचे दुसरे निवेदन दिले. हे आंदोलनच मागे घेतल्याने चौकशी कोणत्या आधारे करणार? त्यामुळे ही चौकशीही थांबली आहे.
- तुषार ठोंबरे, अपर जिल्हाधिकारी, बीड.