बीड : स्थलांतरित जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी अचानक दिलेल्या भेटीत केवळ तीन डॉक्टर कामावर हजर दिसले होते. बाकीचे सर्व गैरहजर होते. या सर्वांची एका दिवसाची वेतनकपात करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले होते. याला पाच दिवस उलटून गेले तरी अद्याप त्यांना साधी नोटीसही बजावलेली नाही.
जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत कोराेनाबाधित व संशयितांवर उपचार केले जातात. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने सर्वच कोरोनामध्ये व्यस्त होते. याचा फायदा स्थलांतरित जिल्हा रुग्णालयातील (आदित्य महाविद्यालय) कामचुकार डॉक्टरांनी घेतला. सीएस, एसीएसला हाताशी धरून काही डॉक्टर आपला खासगी दवाखाना चालवीत होते. याबाबत उपसंचालक डॉ. माले यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. हाच धागा पकडून डॉ. माले यांनी ४ जून रोजी या रुग्णालयाची अचानक भेट देत पाहणी केली. यात त्यांना केवळ तीनच डॉक्टर हजर दिसले. इतर सर्व डॉक्टर रुग्णांना वाऱ्यावर सोडून गायब झालेले होते. तसेच वॉर्डमध्येही डॉक्टरांनी राऊंड घेतलेला नव्हता. हा सर्व प्रकार पाहून डाॅ. माले चांगलेच संतापले. या सर्व डॉक्टरांची वेतनकपात करून त्याची शीट बुकला नोंद करण्याचे आदेश सी.एस. डॉ. सूर्यकांत गित्ते यांना दिले होते. परंतु, पाच दिवस उलटूनही यावर कसलीच कारवाई झालेली नव्हती. यावरून याच अधिकाऱ्यांकडून कामचुकारांना अभय दिले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
सीएस म्हणतात, एसीएसला पत्र दिले
याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गित्ते यांना विचारणा केली असता आपण एसीएसला पत्र दिले असून कारवाई करण्यास सांगितल्याचे ते म्हणाले; तर डॉ. राठोड यांनी डॉक्टरांची यादी काढणे सुरू असल्याचे सांगितले. मागील पाच दिवसांपासून केवळ टोलवाटोलवी करून कामचुकार डॉक्टरांना अभय देण्याचा हा प्रयत्न अधिकाऱ्यांचा दिसत आहे.
--
प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर जबाबदारी
ओपीडी विभागातील ज्या नियमित व कंत्राटी डॉक्टरांची ड्यूटी होती, त्यांनी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर जबाबदारी सोडली होती. ही बाब उपसंचालकांनी स्वत: पाहिली. हा प्रकार पाहून त्यांनीही कानाला हात लावले होते.
---
ओपीडीतील रुग्णसंख्या केवळ ५०
जिल्हा रुग्णालय असल्याने येथे ओपीडीत येणाऱ्या रुग्णांची संख्या किमान ५०० पेक्षा जास्त असायला हवी. परंतु, डॉक्टर हजर राहत नसल्याने रुग्णसंख्या केवळ ५० वर आली आहे. आकडा एवढा कमी झालेला असतानाही अधिकाऱ्यांनी याकडे कसलेच लक्ष दिले नाही. याचा फटका सामान्यांना बसला. खासगी रुग्णालयात जावे लागल्याने आर्थिक भुर्दंड बसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
---
मी भेट दिल्यानंतर लगेच गैरहजर डॉक्टरांची वेतनकपात करण्याचे आदेश दिले होते. अद्याप कारवाई झाली नसेल तर गंभीर बाब आहे. आता त्यांना मी पत्र पाठवून खुलासा मागवितो.
- डॉ. एकनाथ माले, उपसंचालक