लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोना लसीकरणावर जास्तीत जास्त भर दिला जात आहे. यामुळे प्रतिकारशक्ती वाढत असल्याचा दावा केला जात आहे. असे असले तरी काही लाेकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यात लसीकरणानंतर किती दिवस मद्यपान करायचे नाही? असा प्रश्न खूप लोकांना पडत आहे. यावर वैद्यकीय तज्ज्ञांनी मद्यपान टाळाच, असे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. जे लोक नियमित मद्यपान करतात, ते लस घेण्यासाठी जातानाही मद्यपान करून जातात. तसेच लस घेतल्यावरही मद्यपान करतात. अशा लोकांना उलटी, सर्दी, ताप आदी लक्षणे व त्रास होण्याची दाट शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
मद्यपान टाळण्याचे आवाहन
शासनाच्या नियमात काेठेही मद्यपानाबद्दल लिखित स्वरूपात काहीच नाही. परंतु, लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर काहीच दिवस मद्यपान टाळावे, असे सांगण्यात आलेले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते मद्यपान केल्यानंतर त्रास होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मद्यपान टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.
मद्यपान करणे तसे शरीरासाठी कायम घातकच असते. परंतु, जे कोण करतात, त्यांनी लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतरही मद्यपान करणे चुकीचे आहे. लसीकरणानंतर मद्यपान करण्याबद्दल तशा काही गाईडलाइन्स नसल्या तरी अल्कोहोल अव्हाइड करावे, असे सांगण्यात आलेले आहे. लस घेताना किंवा नंतर मद्यपान केल्यास त्रास होण्याची दाट शक्यता असते.
- डॉ. बाबासाहेब ढाकणे, जिल्हा रुग्णालय, बीड