- सोमनाथ खताळ
बीड : गुन्ह्यातील आरोपींना घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला महिला डॉक्टरने अरेरावी केली. तसेच याच महिला डॉक्टरविरोधात आलेल्या तक्रारींचा ढिगारा पाहून त्यांची तातडीने उचलबांगडी करत माजलगाव ग्रामीण रूग्णालयात बदली करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
डॉ.शेख नाजीया असे या महिला डॉक्टरचे नाव आहे. नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव हे शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर करायचे असल्याने नेकनूर स्त्री रूग्णालयात आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी गेले होते. तेथे एकही डॉक्टर हजर नव्हते. संबंधित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावरील डॉ.शेख नाजीया यांना संपर्क करून बोलावून घेतले. यावर त्या चांगल्याच संतापल्या. सारखा काय त्रास देता, कशाला येता इकडे असे म्हणत तपासणी करण्यास हलगर्जी केली. तसेच मी नसताना आले म्हणून उपनिरीक्षक जाधव यांना अरेरावी केली. ही बाब त्यांनी वरिष्ठांना कळविल्यानंतर लगेच जिल्हा शल्य चिकित्सकांनी धाव घेत खात्री केली. यावर आतापर्यंतच्या सर्व तक्रारी आणि या तक्रारीतील चौकशी करून डॉ.शेख नाजीया यांची उचलबांगडी करत माजलगाव ग्रामीण रूग्णालयात बदली केली. याने उद्धट वागणूक देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
बीडमधील प्रकल्प प्रेरणा विभागावर कारवाईची टांगती तलवार; संचालकांकडून चौकशीचे आदेश
आरोग्य मंत्र्यांकडे तक्रारया प्रकरणाची सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. यात संबंधित डॉक्टरवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
अधिकाऱ्यांना अरेरावी केलीआमचे अधिकारी आरोपींना घेऊन रूग्णालयात गेले. तेथे डाॅक्टर हजर नव्हते. एक महिला डॉक्टर आल्यावर त्यांनी आमच्या अधिकाऱ्यांना उद्धट वागणूक देत अरेरावी केली. वैद्यकीय तपासणीस उशिर झाल्याने आरोपींना न्यायालयात हजर करायला वेळ लागला. आम्ही लेखी तक्रार केली नाही, परंतू सीएस यांना तोंडी कळविले आहे.- लक्ष्मण केंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक नेकनूर
बदली केली आहेनेकनूर रूग्णालयातील महिला डॉक्टरच्या तक्रारी वाढल्या होत्या. या प्रकरणात काय तथ्य, याची चौकशी केली जाईल. तोपर्यंत डॉ.शेख नाजीया यांची माजलगाव ग्रामीण रूग्णालयात बदली केली आहे.- डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड
पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत गोपीनाथ गडावरून भागवत कराडांची यात्रा