बीड - राष्ट्रवादी काँग्रेसकडून अचानकपणे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या गोटात बजरंग सोनवणे कोण ? असा प्रश्न अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनाही पडला आहे. कारण, प्रीतम मुंडेंविरुद्ध लोकसभेसाठी अमरसिंह पंडित यांचे नाव चर्चेत होते. मात्र, ऐनवेळी कट्टर धनंजय मुंडे समर्थक असलेल्या बजरंग सोनवणे यांना तिकीट देऊन पवारांनी पुन्हा एकदा राजकीय डावपेच आखले आहेत. तर, प्रीतम मुंडेंना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाल्यास, या मतदारसंघात डॉक्टर विरुद्ध इंजिनिअर असा सामना पाहायला मिळणार आहे.
बीड लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची उमेदवारी अनपेक्षित जाहीर करून संपूर्ण बीड जिल्ह्याला आश्चर्याचा धक्का दिला. विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेले बजरंग सोनवणे आणि भाजपाच्या डॉ. प्रीतम मुंडे यांच्यातील लढतीबद्दल सोशल मीडियावर घमासान चालू असून शंका, कुशंका घेण्यात येत आहेत.
बजरंग सोनवणे हे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते स्वत: आणि त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. यापूर्वीही बजरंग सोनवणे यांनी बीड जि.प.चे शिक्षण आणि आरोग्य सभापतीपद भूषिवले. बजरंग सोनवणे यांच्या ताब्यात केज खरेदी विक्री संघ असून येडेश्वरी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. धंनजय मुंडे यांचे त्यंत विश्वासू म्हणून ते ओळखले जातात. मुंडेंसोबतच सोनवणे यांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर, बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना हटवून बीड जिल्हाध्यक्षही मिळविले आहे. राजकारणी नेत्यापेक्षा उद्योजक, कंत्राटदार अशी त्यांची जास्त ओळख आहे.
बजरंग सोनवणे हे मूळ केज तालुक्यातील आनंदगाव येथील रहिवासी आहेत. शेतकरीपुत्र असले तरी मोठे कंत्राटदार, उद्योजक म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख निर्माण झाली आहे. सर्वप्रथम ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष ते लोकसभा उमेदवार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. सोनवणे यांनी बीए पदवीधर आणि (इंजिनिअरींग डिप्लोमा स्थापत्य) असे शिक्षण घेतले आहे. त्यामुळे भाजपाने बीडमध्ये प्रीतम मुंडे यांना तिकीट दिल्यास ही लढत डॉक्टर विरुद्ध इंजिनिअर अशी राहणार आहे.