बीड : अवयदानाच्या जनजागृतीसाठी बीडमध्ये इंडियन मेडिकल असोसीएशनच्या बीड शाखेच्या वतीने ‘आयएमए मॅरेथॉन स्पर्धा’ रविवारी सकाळी ६ वाजता घेण्यात येत आहे. नागरिकांच्या आगोदर डॉक्टरांमध्ये जनजागृती होऊन विश्वास वाढण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा असून यात सर्व डॉक्टर आपल्या परिवारासह धावणार आहेत. पाच व दहा किमी अंतर या स्पर्धेसाठी राहणार असून ३५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे.
बीडमध्ये आयएमए बीड शाखेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांसह कार्यक्रम घेतले जातात. त्यातीलच मॅरेथॉन स्पर्धा एक आहे. अवयदानाबद्दल समाजात जनजागृती करण्यासाठी आगोदर डॉक्टरांमध्ये होणे गरजेचे आहे. केवळ जनजागृृतीच नव्हे तर त्यांचा विश्वास वाढण्याचीही गरज असल्याचे पाहून ही स्पर्धा घेण्यात आली. यात केवळ डॉक्टरांनीच नव्हे तर त्यांच्या सर्व परिवाराने सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे १ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता नामलगाव फाट्यावरील गुरुकूल पब्लिक स्कूलच्या प्रांगणात सर्वजण एकत्रित जमणार आहेत. जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पाच किलोमिटर व दहा किलोमिटर अंतर अशा दोन गटात ही स्पर्धा होईल याच ठिकाणी पािरतोषीक वितरण करण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन आयएमए बीड शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल बारकुल यांच्यासह सर्व पदाधिकारी, संयोजन समितीने केले आहे.
अवयदानाची जनजागृती आपल्यापासूनच व्हावी, या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जात आहे. यामुळे जनजागृतीबरोबरच विश्वास वाढेल. ३५० स्पर्धक सहभागी होतील. डॉक्टरांसह कुटूंबांचा यात समावेश असेल. स्पर्धेनंतर बक्षिस वितरण होईल.- डॉ.अनिल बारकुल, अध्यक्ष, आयएमए बीड