- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई (जि.बीड) : एखादा व्यक्ती गंभीर भाजणे हीच मुळात अंगावर शहारे आणणारी बाब. त्यातच तो जळीत रुग्ण ८० टक्क्यांपेक्षा अधिक भाजलेला असेल तर त्याचा जीव वाचण्याची शक्यता नसतेच. परंतु, अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील सर्जरी विभागातील डॉक्टरांच्या चमूने ८५ टक्के भाजलेल्या रुग्णावर यशस्वी उपचार करून त्याला अक्षरश: मृत्युच्या दाढेतून परत आणले.
माजलगाव तालुक्यातील मोटेवाडी येथील रामेश्वर शंकर चव्हाण (वय २५) हा तरुण १३ डिसेंबर २०१८ च्या पहाटे घरात लागलेल्या आगीत गंभीररित्या भाजला. त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. डॉक्टरांनी रामेश्वरला तपासून तो ८५ टक्के जळीत असल्याचे निदान केले. त्यामुळे त्याचा जीव वाचण्याची संधी ०.८ टक्के म्हणजे जवळजवळ शून्य असल्याची माहिती रामेश्वरच्या कुटूंबियांना देण्यात आली. रामेश्वरचा जीव वाचण्याची शक्यता धूसर झाली असतानाही सर्वोतोपरी उपचार करून त्याला जगविण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करण्याचे डॉ. नितीन चाटे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रवीण गोवंदे, डॉ. महेश महाजन, डॉ. वल्लभ जाने, डॉ. अमोल केंद्रे यांच्या पथकाने केले.
जळीत रुग्णांच्या उपचारांसाठी मोजक्या ठिकाणी वापरले जाणारे काही अत्याधुनिक इंजेक्शन रामेश्वरच्या ऊपचारांसाठी तातडीने व मोफत उपलब्ध करण्यात आले. रामेश्वरच्या संपूर्ण शरीरावरील जखमांची जवळपास दररोज शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करुन पट्टी बांधण्यात आली. सर्वात महत्वाचे म्हणजे सुरुवातीच्या आठवड्यात जंतूसंसर्गाचा मोठा धोका नव्यानेच रुग्णालयात उपलब्ध झालेल्या आधुनिक औषधींमुळे यशस्वीरित्या टाळता आला. डॉक्टरांच्या प्रयत्नांसोबतच नर्सिंग स्टाफनेही विशेष परिश्रम घेतले.
विक्रमी कामगिरी विभागप्रमुख डॉ. नितीन चाटे यांच्या नेतृत्वात सर्जरी विभाग नवनवीन प्रांतामध्ये विक्रमी कामगिरी करत आहे. ८५ टक्के जळीत रुग्ण बरा करण्याचा वैद्यकशास्त्रात अतिशय दुर्मिळ असलेला हा विक्रम सर्जरी विभाग व एकूणच स्वाराती रुग्णालयावर परिसरातील जनतेचा विश्वास वृद्धिंगत करणारी बाब आहे. -डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता