बीड : आरोग्यसेवेत काम करणाऱ्यांना देवदूत समजले जाते; परंतु काही डॉक्टर, कर्मचारी सेवेत हलगर्जीपणा करून केवळ वेतनावर डल्ला मारण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या अवलंबत असल्याचे समोर आले आहे. ३०० रुपयांचा रबरी शिक्का बनवून शिपाई अथवा खासगी व्यक्तींमार्फत बायोमेट्रिकवर हजेरी लावली जात असल्याचा प्रकार नाळवंडीनंतर आता टाकरवणमध्येही उघड झाला आहे. काम कमी आणि कुटाणे करण्यातच डॉक्टर, कर्मचारी अग्रेसर असल्याने संताप व्यक्त होत असून, सेवेत हलगर्जी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
माजलगाव तालुक्यातील टाकरवण आरोग्य केंद्रात सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख यांनी भेट दिली होती. यात येथील दोन्ही वैद्यकीय अधिकारी गैरहजर आढळले; परंतु बायोमेट्रिकवर त्यांची हजेरी दाखविली जात होती. त्यानंतर काही दिवसांतच एका दाम्पत्याने विष प्राशन केले. उपचारासाठी आरोग्य केंद्रात गेल्यावर कुलूप दिसले. त्यामुळे नातेवाइकांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. दुसऱ्याच दिवशी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी डॉ. चंदाराणी नरवडे या हजर होत्या तर डॉ. आकाश राठोड हे न सांगताच गैरहजर होते. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी या दोघांनीही नोटीस बजावली.
या आरोग्य केंद्रातील हजेरीबद्दल संशय बळावल्याने १ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता डीएचओ डॉ. अमोल गिते व माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. संजय कदम यांनी अचानक भेट दिली. यावेळीही दोन्ही डॉक्टर गायब होते. डॉ. गीते यांनी सर्व उलटतपासणी केली असता अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. विशेष म्हणजे डॉ. गीते यांनी स्वत: हजेरी तपासली. यात अनेक संशयास्पद गोष्टी आढळल्याचे सूत्रांनी सांगितले. आता या सर्व प्रकरणात नोटीस बजावून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
गोपनीय अहवाल सचिवांकडेटाकरवण आरोग्य केंद्रातील भेटी, संशयास्पद गोष्टी आणि कर्तव्यावर नसतानाही बायोमेट्रिकवर हजेरी या सर्व बाबींचा गोपनीय अहवाला आरोग्य संचालक, आयुक्त आणि प्रधान सचिवांना पाठविला जाणार आहे. त्यापूर्वी एक नोटीसही बजावली जाणार आहे.
काय म्हणतात, वैद्यकीय अधिकारी....वरिष्ठांनी जेव्हा भेटी दिल्या, त्यावेळी मी हजर होते. अँगल कॅममुळे माझी हजेरी पूर्ण आहे. डीएचओंनी ते तपासलेदेखील आहे. गुरुवारी वरिष्ठ आले तेव्हा मी त्यांना कल्पना देऊन दुपारनंतर गेले होते. रबरी शिक्क्यांबाबत गैरसमज होता, तो दूर झाला, असे डाॅ. चंदाराणी नरवडे यांनी सांगितले. तर डॉ. आकाश राठोड यांनी तसे काहीही नाही, असे सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पुरावे...गुरुवारच्या भेटीत डॉ. गीते यांच्याकडे रबरी शिक्के, बायोमेट्रिक हजेरी, एएनएम, कर्मचारी आणि लॅबचालक यांच्याकडील लेखी जबाब व इतर काही माहिती आहे. यात मोठ्या प्रमाणात तफावत आहे. तसेच खासगी व कंत्राटी लॅबवालाही यात सहभागी असल्याचे समोर आले आहे. या सर्व बाबींना डॉ. गीते यांच्याकडून दुजोराही मिळाला; परंतु ही कारवाई गोपनीय असून, योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगून ते शांत बसले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे म्हणाले, २२ जुलैपासून अँगल कॅम सुरू झाला. त्यानुसारच मी हजेरी देणार आहे. ऑगस्ट महिन्यातील हजेरी बनवून डीएचओंना पाठवणार आहे.
विनापरवानगी लॅबआरोग्य केंद्राजवळ असलेल्या एका लॅबचीही डॉ. गीते व डॉ. कदम यांनी तपासणी केली; परंतु तत्पूर्वीच लॅब बंद करून चालक पसार झाला होता; परंतु लॅबला कसलाही परवाना नाही. या सर्व बाबींची तपासणी करून अहवाल देण्याच्या सूचना डीएचओंना दिल्याचे डॉ. गीते म्हणाले.