परळी : शंभर खाटांच्या येथील उपजिल्हा रुग्णालयास सिटीस्कॅन मशीनला काही वर्षांपूर्वी दिलेली मंजुरी कागदोपत्रीच ठरली आहे. विशेष म्हणजे सिटीस्कॅनसाठी जागाही निश्चित असली तरी प्रत्यक्षात मात्र ही मशीन येथे आरोग्य विभागाने उपलब्धच करून दिली नाही. कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली असल्याने सिटी स्कॅन मशीनची उपजिल्हा रुग्णालयाला सध्या आवश्यकता असून, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित घाडगे-पाटील यांनी केली आहे.
शहरात एकच खासगी फोर स्लाईसची सिटीस्कॅन मशीन आहे. त्यामुळे त्यावर ताण आहे. सोबतच रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कोविड तसेच नॉन कोविड रुग्णांसाठी सिटीस्कॅन उपलब्ध करून वापरात आले तर तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
प्रत्येक महत्त्वाच्या आरोग्य सुविधेसाठी परळीकरांनी कधीपर्यंत अंबेजोगाईच्या स्वा.रा.ती. रुग्णालयावर अवलंबून राहायचे?असा प्रश्नही घाडगे यांनी उपस्थित केला आहे. नागापूर येथील एका रुग्णास रात्री सिटीस्कॅनसाठी अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती. रुग्णालयात घेऊन जावे लागल्याची वेळ नातेवाइकावर आल्याचा प्रकार गेल्या पंधरा दिवसांपूर्वी घडला. त्यानंतर उपचारासाठी रुग्णास पुन्हा परळीत आणावे लागले, असे परळीतील रुग्णांचे हाल होत आहेत.
परळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यापूर्वी भंडारा, भांडूप, विरार येथील आगीच्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अग्निशामक तपासणी करून सक्षम फायर सेफ्टी यंत्रणा उपलब्ध करून द्यावी. तसेच नाशिकमधील प्राणवायू संकटाचीही घटना आपल्या इथे घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे घाडगे म्हणाले.
परळी येथील उपजिल्हा रुग्णालयास सिटीस्कॅन मशीनची मंजुरी आहे; पण उपलब्ध नाही. कोविड केअर सेंटर उद्यापासून सुरू होईल. -डॉ. अर्शद शेख, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, परळी.