अंबाजोगाई : सर्वत्र मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण होत आहे. लसीकरणानंतर काही दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी युवकांनी रक्तदान करावे व नंतर लस घ्यावी, असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष धनराज सोळंकी यांनी केले आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा भासतो. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. त्यामुळे रक्तदान शिबिरांची संख्या ही कमी होत आहे. थालासेमिया, सिकलसेल, हिमोफेलिया या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना दर पंधरा दिवसाला रक्त द्यावे लागते. गर्भवती स्त्रिया व इतर रुग्णांना रक्ताची नितांत गरज भासते. लसीचे डोस घेतल्यास किमान २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे १८ वर्षांवरील व्यक्तींनी लस घेण्यापूर्वी रक्तदान करावे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. प्रत्येक निरोगी व्यक्तीने रक्तदान करून इतरांचे जीव वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदानाची व्यवस्था आहे. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. या कामी जास्तीत जास्त युवकांनी पुढे यावे, असे आवाहन सोळंकी यांनी केले आहे.