१४ बीइडीपी २१ पूजाचे पोल्ट्री फार्म
१४ बीइडीपी २२ लहू चव्हाण (पूजाचे वडील)
कोणाविरोधातही तक्रार नाही, कुणाविषयी शंका नाही : पूजाचे वडील लहू चव्हाण यांचे स्पष्टीकरण
परळी : पूजा चव्हाणच्या मृत्यूप्रकरणी आपली कोणाविरोधातही तक्रार नाही व कुणाविषयी शंका नाही. परंतु पोल्ट्री फार्ममध्ये आलेल्या नुकसानीचा पूजावर ताण होता, असे पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी रविवारी ‘लोकमत’ला सांगितले. या प्रकरणात कुणावरही संशय नाही. आमची आणि समाजाची बदनामी करून आम्हाला वेदना देऊ नका. ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत, त्यातील आवाज पूजाचा नाही, असे ते म्हणाले. या प्रकरणात ज्यांचे नाव जोडले जात आहे, ते मंत्री संजय राठोड हे पूजाच्या वडिलांसारखे आहेत. आमचा कोणावरही आक्षेप नसल्याचे ते म्हणाले. परळी शहरातील देशमुख पार येथे पूजा चव्हाण आपल्या आईवडिलांसह राहत होती. तिचे वडील लहू चव्हाण यांचा परळीपासून जवळच वसंतनगर तांडा येथे अनेक वर्षांपासून पोल्ट्री फार्म आहे, तर गेल्या तीन वर्षांपासून पूजा चव्हाण हिनेही स्वतः पोल्ट्री फॉर्म उघडला होता. लहू चव्हाण यांनी रविवारी आपले दुःख मांडले, पोल्ट्री फार्म व्यवसायात गेल्या दोन वर्षांपासून आम्हाला नुकसान झाले होते. याचा ताण पूजा चव्हाणवर होता. गेल्या आठ दिवसांपूर्वी ती पुण्याला गेली होती. तिला मोठे व्हायचे होते; परंतु अचानक तिचा मृत्यू झाला. याबाबत आपली कुणाविषयी शंका नाही, कोणाला दोष द्यायचा नाही, पूजा चव्हाणच्या मृत्यूमुळे आमच्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला आहे. पूजाला पाच बहिणी आहेत. पूजा ही सर्वात स्ट्राँग मुलगी होती. ती आम्हाला मुलासारखी होती. इतर पाच बहिणींनाही तिचा आधार होता असे ते म्हणाले. पूजा चव्हाणची माध्यमाद्वारे जी बदनामी होत आहे ती थांबवावी, बदनामीचा आम्हाला त्रास होत असल्याचे लहू चव्हाण म्हणाले.
बंजारा समाज कोर्टात जात नाही एखाद्या प्रकरणाचा मुख्य नाईक निर्णय घेतात. तसेच पूजाच्या मृत्यूप्रकरणी जे सत्य बाहेर येईल ते सर्वांना मान्य असेल, असेही पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी सांगितले. बर्ड फ्लूमुळे अनेक कोंबड्या मेल्या तर काही पडेल भावात विक्री कराव्या लागल्या. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय तोट्यात आला. झालेले नुकसान तिला सहन झाले नाही. कर्जाचा ताण घेऊ नको, आपण कर्ज घेऊ असे तिला समजावून सांगितले होते. पण ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती. त्यावर उपचारही चालू होते, असे लहुदास चव्हाण म्हणाले.