लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. तरीही मंगळवारी ४४ हजार डोस प्राप्त झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु पहिला डोस घेतलेल्या लोकांचा जीव टांगणीला लागला असून दुसरा डोस कधी मिळतो, याची प्रतीक्षा त्यांना लागली आहे. परंतु आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नये. लस प्राप्त होताच आपण लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३४ हजार लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. यात १ लाख ९० हजार लोकांनी पहिला डोस घेतला असून दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ४३ हजार २४० एवढी आहे. या आकडेवारीवरून दुसरा डोस घेणारे हजारो लोक प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. आरोग्य विभागाकडे लसच मिळत नसल्याने हा तुटवडा जाणवत आहे. शासकीय आरोग्य संस्थेत लस मिळत नसल्याने खासगी केंद्र बंद करण्यात आलेले आहेत. त्यांन लस दिली जात नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, आता १८ वर्षांवरील लोकांसाठी तर केवळ १२ हजार ५०० डोस प्राप्त झाले आहेत. एकूण लाभार्थ्यांची संख्या १४ लाखांवर असून हे डोस खूपच अपुरे आहेत.
कोरोनामुक्तनंतर घ्या लस, पण...
आपण कोरोना पॉझिटिव्ह आलेला होता. कोरोनामुक्त होऊन घरी गेलात आणि आपल्याला काहीच लक्षणे नसतील तर आपण कोरोना लस घेऊ शकतो. याबाबत आयसीएमआरने तशा मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत, असे नोडल ऑफिसर डॉ. संजय कदम यांनी सांगितले. तसेच सूचना नसल्या तरी किमान किमान दोन महिन्यांनी लस घेणे अपेक्षित असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात टप्याटप्याने लस होतेय उपलब्ध
n जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. तरीही मागील आठवड्यापासून जिल्ह्यात टप्याटप्याने लस उपलब्ध होत आहे.
n मंगळवारी जिल्ह्यात ४४ हजार डोस ४५ वर्षांवरील वयोगटांसाठी प्राप्त झाले होते. प्राथमिक आरोग्य केंद्राला ६०० तर ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालयाला १००० डोस दिले.