बीड : राष्ट्रीय महामार्ग ५४८ ‘ब’ परळी-अंबाजोगाईला २०१७ साली केंद्र सरकारने निविदा काढून रस्त्याच्या कामाची संबंधित कंत्राटदाराला ऑर्डर देऊन काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. परंतु, महामार्ग दोन्ही बाजूने खोदल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच कामाचा निकृष्ट दर्जा व विहीत मुदतीत काम न झाल्यामुळे देयके अदा करू नयेत अशी तक्रार काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी भारत सरकार व राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीमुळे निविदा रद्द करून नव्याने टेंडर काढण्यात आले. निकृष्ट दर्जाच्या कामाचे सर्व पुरावे संबंधित केंद्र व राज्य सरकारच्या रस्ते वाहतूक विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे जुने टेंडर रद्द करून नव्याने टेंडर काढण्यात आले. त्यात १५३ कोटी वरून १३४ कोटी रुपयांचे काम १०० कोटी रुपये कमी दराने औरंगाबाद येथील एका खसगी कंपनीला मिळाले. जानेवारी २०२० ला कामाची सुरुवात झाली होती. मात्र, धिम्या गतीने काम सुरू असून, आतापर्यंत अनेक अपघात महामार्गावर झाले आहेत. त्यात मृत्यूदेखील झाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी बीड यांनी कंत्राटदारावर मनुष्यवध गुन्हा दाखल करण्याची तंबीदेखील दिली होती. तसेच तक्रारीद्वारे निविदेच्या तरतुदीनुसार महामार्ग कामाच्या नियमाचे उल्लंघन होत आहे.
तक्रारीवरून दक्षता पथकामार्फत चौकशी करून सूचनाही देण्यात आल्या. परंतु, कामाच्या गुणवत्तेचा दर्जा खराब असून, निकृष्ट काम चालू आहे. कामाचा दर्जा सुधारणा होत नसल्यामुळे परळी अंबाजोगाई ५४८ ब रस्त्याचे कामाची देयके अदा करू नयेत अशी मागणी मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली होती. त्यावर १ जानेवारी २०२१ ला शासनाकडून संपूर्ण कामाच्या दर्जासंदर्भात चौकशी होऊन अहवाल सादर होईपर्यंत देयके अदा करू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
तक्रारीमुळे जनतेच्या पैसा वाचला
नागरिकांनी भरलेल्या करातून विकासकामे केली जातात, महामार्गाच्या कामाची तक्रार दिल्यामुळे फेरनिविदा काढण्यात आल्या होत्या, या कामात जवळास ५० कोटी रुपये शासनाचे म्हणजेच जनतेचा पैसा वाचला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिली.