जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्हा विळख्यात घेतला आहे. बुधवारी ३ हजार ५५४ जणांच्या तपासणीचे अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त झाले. यामध्ये २ हजार ६२६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ९२८ नवे रुग्ण आढळून आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक २५२ रुग्ण आढळले. आष्टी तालुक्यात ११२, बीडमध्ये २४६, धारुरमध्ये ४१, गेवराईत ५५, केजमध्ये ६९, माजलगावात ५१, परळीत ४०, पाटोद्यात २०, शिरुरमध्ये २४ तर वडवणी तालुक्यात १८ नवे रुग्ण आढळून आले. तसेच आरोग्य विभागाच्या पोर्टलवर सात जणांच्या मृत्यूची नोंद बुधवारी झाली. यामध्ये, अंबाजोगाई शहरातील ४० वर्षीय पुरुष, बीड शहरातील ६५ वर्षीय पुरुष, परळी तालुक्यातील हाळम येथील ५२ वर्षीय महिला, बीड तालुक्यातील आनंदवाडी येथील ७५ वर्षीय पुरुष, वडवणी शहरातील ६० वर्षीय महिला, आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील ६५ वर्षीय पुरुष, आणि अंबाजोगाई शहरातील ७४ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३४ हजार ९८९ इतकी झाली असून ३० हजार ४७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ७२९ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अशी माहिती सीईओ अजित कुंभार, डीएचओ डॉ. आर. बी. पवार व जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.
डीएचओंची नागापुरात धाव
बीड तालुक्यातील नागापूर येथे एकाच दिवसात कोरोना बाधित रुग्णांनी अर्धशतक गाठले. ॲंटीजेन चाचणी केल्यानंतर येथील ५० पेक्षा जास्त ग्रामस्थ बाधित आढळले होते. यावर बुधवारी सकाळीच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी नागापुरात धाव घेतली. यावर ग्रामस्थांशी चर्चा करुन आरोग्य विभागाच्या पथकाला योग्य त्या सूचना केल्या. सोबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट व आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांचीही उपस्थिती होती.
===Photopath===
140421\14_2_bed_15_14042021_14.jpeg
===Caption===
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी नागापूर येथे बुधवारी सकाळीच धाव घेत ग्रामस्थांशी संवाद साधून आपल्या पथकाला सुचना केल्या. यावेळी सोबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट उपस्थित होते.