नांदूरघाट (जि. बीड): दीड महिन्यापासून चोरट्यांनी नांदूरघाटमध्ये थैमान घातले आहे. रविवारी रात्री तर कहरच केला येथील सुभाष झाडबुके यांच्या घरावर मोठा दरोडा टाकण्याच्या इराद्याने १० ते १५ दरोडेखोरांनी दार पेटवून तसेच मारहाण करत परिसरात दहशत निर्माण केली.
रात्रीच्या दीड ते तीनच्या दरम्यान पोलीस चौकीच्या मागील परिसरात बहुतांश घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. घरामध्ये प्रवेश न करता आल्याने दरोडेखोरांनी परिसरातील घरांना बाहेरून कडी लावली. त्यानंतर मोर्चा सुभाष झाडबुके यांच्या घरावर वळवला. घरामध्ये सुभाष झाडबुके त्यांच्या पत्नी व आई एवढेच होते. दरोडेखोर घरावर चढण्याचा प्रयत्न करत होते. खूप प्रयत्न केले तरी आतमध्ये प्रवेश करता येईना म्हणून दरोडेखोरांनी दार हत्याराने तोडायला चालू केले. हे प्रयत्न निष्फळ ठरल्याने देशी दारू टाकून दार पेटवले व दुसऱ्या बाजूने दरवाजा तोडणे चालू होते. या आवाजाने झोपलेले सुभाष झाडबुके जागे झाले. त्यांनी तत्काळ कामावर असणाऱ्या मुलाला उठवले. कशाचा आवाज येतोय म्हणून पाहण्यासाठी दुसऱ्या दाराने बाहेर आले. बाहेर येताच चार ते पाच जणांनी झाडबुके यांच्यावर हल्ला केला. उर्वरित चार ते पाच जण पाठीमागून दार तोडत होते. झाडबुके यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु दरोडेखोरांनी काठ्याने मारायला चालू केले. झाडबुकेंच्या ओरडण्याने लोक जमा होताच दरोडेखोरांनी पलायन केले. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारास दाखल केले. या दरोड्यामध्ये चोरी झाली नाही. सुभाष झाडबुके यांच्या प्रसंगावधानाने व लोकांच्या जागरुकतेमुळे मोठा दरोडा टळला.
हल्ल्यामुळे गावात भीतीचे वातावरणसुभाष झाडबुके यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या घरात बंदूक असणारा आॅफिसर आहे त्या घरावर एवढा मोठा चोरट्यांचा हल्ला होतो तर आपले काय? या विचाराने व्यापारी वर्ग व मध्यम वर्ग भयभीत झाला आहे. पोलीस प्रशासनाने आरोपींच्या मुसक्या आवळाव्यात, नांदूरघाटमध्ये रोज रात्री पेट्रोलिंग चालू करावी, अशी मागणी होत आहे.