- प्रभात बुडूख
बीड : जिल्ह्यात रबी हंगामाचे पेरणीलायक क्षेत्र ४ लाख २२ हजार ७३० हेक्टर असून, यापैकी फक्त २२.९५ टक्के क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे दुबार पेरणी करण्याचे संकट आले आहे.
कापूस या पिकाचे दोन्ही हंगामात उत्पादन घेतले जाते. परंतु, रबी हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामध्ये खरीप हंगामातील कापूस, सोयबीन या मुख्य पिकांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी रबी हंगामातील ज्वारी, गहू, मका, हरभरा या मुख्य पिकांची पेरणी करण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात रबी हंगामातील क्षेत्र ४ लाख २२ हजार ७३० हेक्टर आहे. त्यापैकी फक्त ९७ हजार ३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ज्वारीची ८५ हजार ९६८ हेक्टरवर व हरभऱ्याची १० हजार ३९४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे रबी हंगामातील पेरणीला उशीर झाला असून अजूनही अनेक ठिकाणी वापसा आलेला नसल्यामुळे पेरणी करणे शक्य नाही. नोव्हेंबर अखेरपर्यंत रबी पेरा पूर्ण होईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
पेरणीपुढेच पाऊसरबी हंगामात प्रामुख्याने ज्वारी हे पीक घेतले जाते. यामुळे जनावरांची चारा व धान्य या दोन्हीची गरज भागते. त्यामुळे अनेक शेतकरी रबीसाठी क्षेत्र राखून ठेवतात किंवा सोयाबीन पिकाच्या काढणीनंतर रबी हंगामातील पेरणी त्या क्षेत्रावर करतात. दरम्यान, रबी हंगामातील पेरणीच्या तोंडावरच अतिवृष्टीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले. यावेळी शेतकऱ्यांनी रबी हंगामात पेरणी केलेली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे दुबार पेरणीचे संकट आले आहे.