बीड : लग्न जमत नसल्याने मध्यस्थाकरवी दीड लाख रुपये देऊन स्थळ शोधले. मोजक्या नातेवाईकांत लग्नसोहळा पार पडला, पण लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी वधूने पोबारा केला. धारुर तालुक्यात हा धक्कादायक प्रकार १४ नोव्हेंबर रोजी समोर आला. याप्रकरणी पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.
अशोक ताराचंद मोरे (२८, रा. कारी, ता. धारुर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो एका कारखान्यावर मजुरी काम करतो. त्याचे लग्न जमण्यास अडचण येत होती. लग्नासाठी मुलगी शोधण्यास त्याने मुकादम राधाकिसन इखे (रा.तेलगाव, ता.धारुर) यांना सांगितले. त्यांनी त्याला एक मुलगी दाखवली. यावेळी मुलीचे मामा, बहीण, भाऊ उपस्थित होते. लग्नासाठी मुलीला सुरुवातीला ५० हजार नंतर एक लाख असे एकूण दीड लाख रुपये अशोक यांनी दिले होते. १ नोव्हेंबर रोजी त्यांचे लग्न झाले मात्र, ३ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान नवरीने घरातून पळ काढला. रविवारी अशोक मोरे यांनी दिंद्रुड ठाण्यात तक्रार दिली. यावरुन मुकादम राधाकिसन ईखे, नवरी मुलगी अनिता प्रल्हाद शिंदे व तिचा मामा, भाऊ व बहीण यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हवालदार राम खेत्रे तपास करत आहेत.
टोळी सक्रियलग्नाच्या आमिषाने पैसे उकळून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. कारी (ता.धारुर) येथे उघडकीस आलेल्या प्रकाराने लग्नाळू मुलांना जाळ्यात ओढून गंडा घालणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.