बीड - परळीच्या मुंडे रुग्णालयामध्ये २०१२मध्ये उघडकीस आलेल्या स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी डॉ. सुदाम व डॉ. सरस्वती मुंडे दाम्पत्यासह अवैध गर्भपातावेळी मृत्यू झालेल्या महिलेचा पती महादेव पटेकर यांना दोषी ठरवून बीड जिल्हा न्यायालाने १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.मुंडे दाम्पत्याला प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. महादेव पटेकर फरार आहे. अवैध गर्भपात व स्त्री भ्रूणहत्येप्रकरणी एकूण १७ जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. पीडित महिलेचे नातेवाईक व इतर २८ पैकी २२ साक्षीदार फितुर झाले. मात्र, शवविच्छेदन करणारे डॉक्टर, पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर व उपविभागीय पोलीस अधिकारी स्वाती भोर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपपत्र दाखल असलेल्यांपैकी जळगावचे डॉ. राहुल कोल्हे व ३ आरोपींचा मृत्यू झाला, तर १० जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.गर्भपाताचे रॅकेट उघडतपासात गर्भपात केलेली अर्भके प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून डॉ. मुंडे याच्या शेतातील पडक्या विहिरीत टाकल्याचे समोर आले होते. विजयमाला यांना चार मुली होत्या, त्या पाचव्यांदा गर्भवती होत्या.
डॉ. मुंडे दाम्पत्याला स्त्री भ्रूणहत्येप्रकरणी सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 6:40 AM