संरक्षक कठडे बसवा
माजलगाव : येथील धरण बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. अनेक लोक पाण्यात उतरून फोटो काढतात. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. या परिसरात संरक्षक कठडे बसविण्यासह सुरक्षा रक्षक, अथवा पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
रस्त्याची दुरवस्था
बीड : शहरातील चक्रधर नगर, शिंदे नगर भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या भागामध्ये मुरूम टाकण्यात आला आहे. याचा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, रस्त्याचे डांबरीकरण करावे किंवा सिमेंटचा रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी आहे.
अवैधरीत्या दारूविक्री
वडवणी : काही दिवसांपूर्वी बंद झालेली अवैधरीत्या दारू विक्री परिसरात जोमाने सुरु असल्याचे दिसून येत आहे, तसेच हॉटेल, पान टपरी तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो. याकडे मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कामे पूर्ण करा
बीड : नगर परिषदेच्यावतीने शहरात सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले; मात्र शहरातील विविध भागात रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अर्धवट काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.