शिरूर कासार : अवघ्या एक महिन्यावर आता पावसाळा येऊन ठेपला आहे. शहरातील काही नाल्या तुडुंब भरलेल्या दिसून येतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या नाल्या स्वच्छ करून वाहत्या कराव्यात, अशी मागणी होत आहे.
अवकाळीची भीती कायम
शिरूर कासार: तालुक्यात शुक्रवारपासून आभाळ गरजणे, विजांचा कडकडाट सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी पावसाची हलकीशी सर आली होती. अजूनही आभाळात ढग गोळा होत असल्याचे चित्र दिसत असल्याने, अवकाळीची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतीकामांना अडथळे येत आहेत.
विजेचा लपंडाव
शिरूर कासार मध्यंतरी काही दिवस वीजपुरवठा सुरळीत चालू होता. मात्र, दोन दिवसांपासून पुन्हा विजेचा लपंडाव सुरू असल्याने, उकाडा असह्य होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सिद्धेश्वर बंधाऱ्याचा तळ पडला उघडा
शिरूर कासार : शहराच्या पश्चिमेला लागून असलेला सिद्धेश्वर बंधारा या वर्षी चांगला भरून नदी वाहत होती. मात्र, उन्हाळी हंगाम घेण्यासाठी झालेल्या पाणी उपशामुळे या बंधाऱ्याचा तळ उघडा पडला असल्याचे दिसून येते.
लाॅकडाऊन कडक, वाहतुकीला मोकळी सडक
शिरूर कासार : कोरोना नियंत्रणात आणून साखळी तोडण्यासाठी लाॅकडाऊन कडक असल्याचा भास असला, तरी लाॅकडाऊन कडक आणि रहदारीला मोकळी सडक, असा काहिसा विरोधाभास दिसून येत असल्याने, महामारीवर नियंत्रण मिळविण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
गुलमोहर बहरला लाल फुलांनी
शिरूर कासार : पानगळ सुरू होऊन झाडाला नवीन पालवी फुटू लागली, तर गुलमोहराची झाडे लाल फुलांनी बहरली असल्याचे सध्या दिसून येते. नवीन पालवी पहाटेच्या प्रहरी सुखद दिलासा देऊन जाते.
कडुनिंबाची गोड कहाणी
शिरूर कासार : सध्या कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन जोराचे प्रयत्न करत असून, आरोग्य विभाग तर मेटाकुटीला आला आहे. अशाही परिस्थितीत काही जुनी वनस्पती आता दिलासा देत असल्याचा विश्वास जागृत होत आहे. कडुनिंबाची अशीच गोड कहाणी आता सुरू आहे. टुथपेस्ट आणि ब्रशच्या जमान्यात दात घासण्यासाठी निंबाची काडी तर पोटातील विकार घालविण्यासाठी निंबाच्या पानांचा रस गुणकारी मानला जात असल्याने, लिंबाच्या झाडाला आता चांगले दिवस आले आहेत.