ऑनलाईन लोकमत
माजलगांव (बीड), दि. ७ : पावसाने पाठ फिरवल्याने माजलगाव धरणातील सध्या शिल्लक असलेला १३ % पाणी साठा जिल्हाधिका-यांनी आरक्षीत केला आहे. असे असतानाही धरणाच्या बॅकवाटर मधुन मोठयाप्रमाणावर विनापरवाना पाणी उपसा सुरु आहे. या अनियंत्रित पाणी उपस्याने पुढे जर पाऊस कमी पडला तर भविष्यात पाण्याची मोठी समस्या उद्भवू शकते.
बीड जिल्यात तसेच तालुक्यात अत्यंत अल्प प्रमाणात पाउस झालेला आहे त्यामुळे माजलगांव धरणात एक थेंबही पाणी आलेले नाही. सध्या धरणात अवघे १३ टक्के पाणी शिल्लक आहे. मागील दोन महिन्यांपासुन पावसाने दडी मारल्यामुळे भविष्यात पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागु शकतो म्हणुन शिल्लक पाणी साठा जिल्हाधिका-यांनी आरक्षीत केला आहे. मात्र, या आरक्षीत पाण्यावर राजरोज खाजगी लोकांकडुन डल्ला मारला जात असुन रात्रंदिवस शेकडो मोटारींद्वारे पाणी उपसा सुरु आहे. या अनियंत्रित उपस्याने दिवसेंदिवस धरणाच्या पाण्याची पातळी खालावत चालली आहे. या बाबत जलसिंचन विभागाने अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारची पाउले उचलली नसल्यामुळे या खाजगी पाणी उपसा करणारांचे मोठे फावत आहे.
धरणाच्या बॅकवाॅटरसाठी मागील ३० च्या कालावधीत केवळ १५८६ जणांनी परवाने घेतलेले आहेत. त्यातही कांही लोकांनी केवळ बॅंकप्रपोजलसाठी हे परवाने घेतलेले आहेत प्रत्यक्ष परवान्याद्वारे पाणी उपसा करणारांची संख्या केवळ २५० ते ३०० आहे. मात्र, सध्या धरणाच्या बॅक वाॅटरमधून जवळपास १५०० मोटारद्वारे पाणी उपसा होत आहे. हा अनधिकृतरि पाणी उपसा तात्काळ थांबवुन संबंधीतांवर कारवाईची मागणी जोर धरु लागली आहे.
फौजदारी गुन्हे दाखल करू बॅकवाॅटरवरुन विनापरवाना पाणी उपसा करणा-यावर कारवाईसाठी तहसील, पोलीस आणि आमच्या कार्यालयाचे मिळुन संयुक्त पथक तात्काळ स्थापन करण्यात येईल. याद्वारे धडक कारवाईची मोहिम हाती घेण्यात येणार आहे. चोरुन पाणी उपसा करणा-यांवर तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. -व्ही. आर. फड, शाखा अभियंता, माजलगांव उपसा सिंचन शाखा क्र. 2