अंबाजोगाई :
सुमारे आठ महिन्यांनंतर लॉकडाऊन उठल्यावर बांधकामाला लागणाऱ्या विटांचा भाव आकारानुसार, सात ते चौदा हजार रुपये असा दुप्पट झाला आहे. बांधकाम व्यवसाय जोमात सुरू असून, मजुरांअभावी बांधकाम करणे सामान्यांचे कंबरडे मोडणारे ठरणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात बांधकाम ठप्प झाल्याने मजूर आपापल्या राज्यात गेले होते.
अद्याप काही मजूर आलेले नसल्याने स्थानिक ठिकाणी मजुरांना बांधकामासाठी एक हजार विटा पाडण्यासाठी ५६० ते ७०० रुपये भाव द्यावा लागत आहे.
लॉकडाऊनपूर्वी लहान विटेला साडेचार हजार रुपये, मोठ्या विटेला नऊ हजार रुपये हजारी भाव होता. तर लॉकडाऊननंतर अचानक भाव सात हजार, तर ११ ते १३ हजारांपर्यंत म्हणजे दुप्पट झाला आहे. सध्या वीट मिळत नसल्याने व पाऊसही उशिरा चालल्यामुळे हा व्यवसाय उशिरा सुरू झाल्याने वीट उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.
लहान वीट सात बाय चार, तर मोठी वीट नऊ बाय पाच असते. हा व्यवसाय चालवण्यासाठी व वीट बनवण्यासाठी दगडी कोळसा, लाकूड, बॉयलर, काळी माती, जाड माती, राख खडवण, घेसू, खोके, पाणी, ट्रॉली, वाहतूक आदींचे भाव वधारले असून, पाण्यासाठी महिन्याचा कालावधी लागतो, तर वीट भाजण्यासाठी महिन्याचा कालावधी लागतो. वीट तयार करण्यापासून तर वीट रचण्यासाठी मजूर व लागणारे साहित्य उपलब्ध होत नसल्यामुळे ठेकेदारांना व सामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे.
महागाई वाढल्याने सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, असा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
लॉकडाऊननंतर विटांचे भाव वाढले आहेत. विटा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, वाहतूक खर्च व कुशल मजुरांची मजुरी वाढल्याने भाव दुप्पट झाला आहे. मजूर मिळत नसल्याने याचा व्यवसायावरही परिणाम होत आहे.
- रफीक शेख (वीट व्यावसायिक, अंबाजोगाई )