अंबाजोगाई ( बीड ): चालकाचे नियंत्रण सुटल्याने राखेची वाहतूक करणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रकचालक जागीच ठार झाला. हा अपघात आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास गिरवली ते घाटनांदूर रस्त्यावर झाला.
जावेद जलालोद्दीन शेख (वय ४०, रा. उमरगा) असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे. तो आज पहाटेच्या सुमारास ट्रकमध्ये (एमएच ०४ डीडी ४४३४) राख भरून उमरग्याकडे निघाला होता. शहरानजीक गिरवली ते घाटनांदूर दरम्यान रस्त्यावर असताना अचानक त्याचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. यातच ट्रकमध्ये दबल्याने जावेद यांचा जागीच मृत्यू झाला.
दोन तासाचे प्रयत्न अयशस्वीअपघात झाल्यानंतर घटनास्थळा जवळ असलेल्या लोकांनी पोलिसांच्या साह्याने गंभीर जखमी झालेल्या ट्रकचालकास बाहेर काढण्यासाठी सलग दोन तास शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, दबलेल्या केबिनमधून त्याला लवकर बाहेर काढणे शक्य झाले नाही. नंतर केबिन तोडून बाहेर काढेपर्यंत जावेदचा मृत्यू झाला होता.