गेवराई : विटांचा ट्रक पळवून नेणाऱ्या टोळीने पाेलीस पाहताच हा ट्रक सोडून दुसरा ट्रक पळविला. त्याचा पाठलाग करून एका दरोडेखोरास मांजरसुंब्याजवळ पकडण्यात पोलिसांना यश आले. इतर फरार दरोडेखाेरांचा पोलीस शाेध घेत आहेत. हा गुन्हा रविवारी घडला.
परळीहून औरंगाबादकडे चालक संजय मुंजाजी चाटे, क्लिनर दत्ता फड व दत्ता चाटे हे विटांचा ट्रक घेऊन जात होते. रविवारी रात्री तालुक्यातील खांडवीजवळ दरोडेखोरांनी ट्रकला दगड मारला. दगडाचा आवाज आल्यानंतर चालकाने गाडी उभी केली. गाडीमध्ये बिघाड झाला की काय असे चालकास वाटल्यामुळे त्यांनी गाडी थांबवली. गाडी थांबताच तीन चार दरोडेखोरांनी चालक आणि क्लिनरचे हातपाय बांधून ट्रक पळवला. दरोडेखोर वडीगोद्रीजवळ ट्रक घेऊन गेले. तेथे ते ट्रकचे टायर काढत असताना निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांनी पळवून आणलेला विटांचा ट्रक सोडून अन्य दुसरा ट्रक घेऊन बीडच्या दिशेने निघाले. पोलिसांनी गेवराई ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुरवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी नाकाबंदी केली मात्र दरोडेखोरांनी पाडळसिंगी येथील टोलनाक्यावर ट्रक न थांबवता टोलनाका तोडून टक पळविला. दरम्यान गेवराई पोलिसांनी बीड पोलिसांशी संपर्क साधला. बीड पोलिसांनीही सर्वत्र नाकाबंदी करून ट्रकचा पाठलाग सुरू केला. सिनेस्टाईल पद्धतीने हा पाठलाग सुरू होता. अखेर मांजरसुंब्याजवळ पोलिसांना एक दरोडेखोर पकडण्यात यश आले. अन्य सहा दरोडेखोर दुचाकीवरून फरार झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजारामा स्वामी , डीवायएसपी स्वप्निल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराईचे पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुरवार , बीड पोलीस वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. दरम्यान मोबाईल व रोख २० हजार असा ३० लाख ८५ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल चाेरून नेल्याप्रकरणी गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीप लुटली
दरोडेखोरांच्या टोळीने याच दरम्यान शहागड परिसरात गोदावरी नदीच्या पुलाजवळ एक जीप अडवून दीड लाख रूपये लुटले. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात नोंद झाल्याचे सांगण्यात आले. महामार्गावर धुमाकूळ घालणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा शोध लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.