- नितीन कांबळे
कडा (बीड): शेतात ड्रोनच्या सहाय्याने फवारणी केली खरी पण शेजारच्या शेतातील पिकाचे यामुळे मोठे नुकसान झाल्याचा प्रकार तालुक्यातील वाकी येथे पुढे आला आहे. शेजारच्या शेतकऱ्यांनी लावलेली सव्वा एकर भेंडीचे पिक जळाल्याने विचारणा करताच शिवीगाळ केल्याने आष्टी पोलिस ठाण्यात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील वाकी येथील परसराम जगन्नाथ आस्वर याची सर्व्हे नंबर ९३ मधील शेती ही येथील दादा आस्वर हे वाट्याने करत आहेत. ११ जुलै रोजी सकाळी आठच्या दरम्यान दादा आस्वर हे शेतात पाहणी करण्यासाठी गेलो असता सव्वा एकर भेंडीचे पिक जळालेले आढळून आले. शेता शेजारील संदीप आस्वर, सुरेश आस्वर, सपना आस्वर यांना विचारले की, तुमच्या शेतात ड्रोनने फवारणी करताना माझे भेंडीचे पिक जळाले आहे. ही फवारणी करताना अशोक आस्वर याने तुम्हाला पाहिले होते. तुम्ही माझ्या जळालेल्या पिकाचा खर्च देऊन टाका, अशी मागणी केली. तेव्हा त्यांनी पिक विमा भरा आम्ही खर्च देणार नाही. काय करायचे करा, असे म्हणत शिवीगाळ केली. याप्रकरणी सव्वा एकर भेंडीचे पिक जाळून नुकसान केल्याने सुरेश नारायण आस्वर,संदिप सुरेश आस्वर, सपना संदिप आस्वर यांच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.