- अनिल महाजन, ( आसोला, ता. धारूर, जि. बीड )
बारमाही पाणीटंचाईला तोंड देणारे गाव अशी धारूर तालुक्यातील आसोला गावाची ओळख झाली आहे. अनेक पिढ्यांपासून हे गाव पाणीटंचाईला तोंड देत असून, दोन नळयोजना होऊनही गाव पाण्यापासून वंचित आहे. गावातील एका जुन्या विहिरीवरच ग्रामस्थांना आपली तहान भागवावी लागत आहे. गतवर्षी तालुक्यात टँकर सुरू असणारे एकमेव गाव होते. यंदाची स्थिती तर पाहायलाच नको.
आसोला अडीच ते तीन हजार लोकसंख्येचे गाव. पावसाळ्यापासून जानेवारीपर्यंत खाजगी इंधन विहिरीवर किंवा गावाशेजारी हनुमान मंदिरामागे असणाऱ्या विहिरीवर तहान भागवावी लागते, अन्यथा शेतातील विहिरीवरून पाणी आणून तहान भागवावी लागते. तालुक्यात टँकरचा पहिला प्रस्ताव दाखल करणारे गाव म्हणून या गावाची ओळख आहे. गावात २० च्या आसपास शासकीय विंधन विहिरी आहेत; मात्र त्या बारमाही बंदच असतात.
या गावात दोन नळयोजना आहेत, त्याही बंदच आहेत. आसरडोह वीस खेडी योजनेत या गावाचा समावेश होता. सुरू होण्यापूर्वीच या योजनेने गाशा गुंडाळला. एकदाही या योजनेतील पाणी गावाला आले नाही. उन्हाळ्यात टँकर सुरू झाले तर हौदात किंवा विहिरीत टँकर टाकून मोजून घागरीने कुंटुंबास पाणी देण्यात येते. याही वर्षी या गावाचा टँकरचा प्रस्ताव पंचायत समितीमध्ये महिनाभरापासून आला आहे.
वेळप्रंसगी शेतातून डोक्यावर अथवा बैलगाडीतून पाणी आणावे लागते. दिवसभरातला सकाळचा किंवा संध्याकाळचा वेळ पाण्यासाठी राखून ठेवावा लागतो. जनावरांना पाण्यासाठी शेतातच व्यवस्था करावी लागते. ज्या विहिरीतून ग्रामस्थ वर्षभर पाणी भरतात, त्या विहिरीचे काम केलेले कडे गतवर्षी कोसळले. त्यामुळे ही विहीर धोकादायक झाली आहे. यावर्षी तर पाणीटंचाईची तीव्रता आणखी वाढली आहे.
सरपंच काय म्हणतात ?आसोला गावाला कुठलीच पाणीपुरवठा यंत्रणा नसल्याने बारमाही पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पेयजल योजनेतून गावासाठी पाणीपुरवठा योजना प्रस्तावित केली आहे. ही योजना लवकरात लवकर व्हावी व गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी प्रयत्नशील आहे. - रंजना गणेश चोले, सरपंच
गावकरी म्हणतात :तीस-पस्तीस वर्षांपासून या गावात राहते. बारमाही पाणी जपून वापरावे लागते. घागरभर पाण्यासाठी पहाटे उठून जावे लागते. पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावरच भागवावे लागते. - सुक्षला वाव्हळ
घागरभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. घरातील कामाबरोबर पाणी आणण्याचे कामही तेवढेच काळजीपूर्वक करावे लागते. बारमाही परवड होते. - कालिंदा वाव्हळ
गावात महिलांना निम्मा वेळ पाण्यासाठीच खर्च करावा लागतो. अगोदर पाण्याचे नियोजन व मग चूल पाहावी लागते. - सावित्राबाई मोरे
आसोला गावात लग्न होऊन येऊन चाळीस वर्षे झाली. येथे कायमस्वरूपी पाणीटंचाई असते. शेतातून येताना डोक्यावर घागरभर पाणी रोजच आणावे लागते. घरात पाणी जपून वापरावे लागते. पायलीला पुजलेली ही समस्या आहे - कौशल्याबाई चोले
योजनांचा सुकाळ, पाण्याचा दुष्काळआसोलासाठी १९७२ च्या दुष्काळात तीन खेडी पाणीपुरवठा योजना हसनाबादच्या तलावावरून झाली होती. नंतर युती सरकारच्या काळात टॅँकरमुक्त गाव करण्यासाठी कुंडलिका प्रकल्पावरून ‘आसरडोह २० खेडी’, तसेच वाडे, तांड्यांसाठी २२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना होती. ही योजना सुरूच झाली नाही, त्यामुळे पाणी मिळाले नाही. इतर जलस्रोत आटले आहेत. सध्या शेतातून पाणी आणावे लागत आहे. गावातील एकमेव स्रोत असलेली विहीरही आटल्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत होरपळ राहणार आहे.
बीड जिल्हा स्थिती :
मोठे प्रकल्प : 02 / 0 /0मध्यम प्रकल्प : 16 / 15.195 / 10.3लघु प्रकल्प : 126 / 10.817 / 4.30एकूण : 144 / 26.012 / 2.92