माजलगाव: माजलगावमधील धरणात बुडून एका डॉक्टराचामृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बेलोरा येथील रहिवासी, पण सध्या माजलगाव येथे वास्तव्यास असलेले डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ( वय 45) हे आज सकाळी माजलगाव धरणात पोहण्यासाठी गेले होते, यावेळी पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली असून, त्यांचे प्रेत दुपारी 2 वाजेपर्यंत सापडले नव्हते.
तालुक्यातील बेलोरा येथील दत्तात्रय श्रीमंत फपाळ यांचे तेलगाव येथे खाजगी हॉस्पिटल आहे. ते गेल्या काही दिवसांपासून माजलगाव येथे वास्तव्यास होते. फपाळ रोज सकाळी माजलगाव धरणामध्ये पोहायला जात होते. दररोजप्रमाणे आजही सकाळी ते पोहायला गेले. धरणात पोहत पोहत ते पाण्यात लांबपर्यंत गेले. पण, परत येत असताना त्यांना दम लागला आणि त्यातच ते पाण्यात बुडाले. प्रत्यक्षदर्शींनी ही माहिती पोलिसांना दिली.
त्यांचा मृतदेह पाण्यात बुडाल्याने मच्छीमारांनी बोलवण्यात आले. परंतू, काही तास उलटूनदेखील त्यांचे प्रेत सापडले नाही. त्यानंतर घटनास्थळी तहसीलदार वर्षा मनाळे यांनी भेट देऊन परळी येथील पथकाला पाचारण केले. रविवारी दुपारी दोनवाजेपर्यंत त्यांच्या प्रेताचा शोध सुरूच होता. घटनास्थळी माजलगाव शहर पोलीसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला होता. यावेळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.