बीड : जिल्हा रुग्णालयात कोराेनाबाधितांवर उपचार करण्यासाठी लागणारे औषधी खरेदी करण्यासाठी करोडो रुपयांचा निधी देण्यात आला. परंतु, तरीही सद्यस्थितीत औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. नातेवाईक तक्रारी घेऊन जिल्हा शल्यचिकित्सकांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे औषधांसाठी आलेला निधी गेला कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे.
कोरोनाची दुसरी लाट कमी होत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या कमी होत आहे. ७२० खाटांमध्ये केवळ ४०० रुग्ण दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असतानाही आराेग्य विभागाकडे औषधी कमी असल्याचे समोर आले आहे. आहे त्या रुग्णांना सलाईनची सुई लावल्यावर लागणारी पट्टी (डायनाप्लास) देखील उपलब्ध नसल्याचे गुरुवारी समोर आले. त्यामुळे साधी पट्टी लावली जात आहे. यासह खोकल्यासाठी आवश्यक असणारे कफ सिरपदेखील उपलब्ध नाही. याबाबत काही नातेवाईकांनी गुरुवारी दुपारी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दालनात धाव घेत औषधांच्या तुटवड्याबाबत कैफियत मांडली.
दरम्यान, शासनासह जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या नावाखाली करोडाे रुपयांचा निधी आरोग्य विभागाला दिला. परंतु, याची व्यवस्थित विल्हेवाट लावली नाही. औषधांची खरेदी कागदावर दाखवून प्रत्यक्षात औषधांचा तुटवडा दिसत असल्याने खरेदी करणारे आणि कंत्राटदार, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी हे सर्वच संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आता या सर्वच प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
---
लोमो इंजेक्शनही मिळेना
कोरोनाबाधितांसाठी रेमडेसिविर आणि लोमो हे दोन इंजेक्शन महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु, सध्या याचाही तुटवडा आहे. केवळ हजार इंजेक्शन सद्यस्थितीत उपलब्ध आहेत. आणखी ११ हजार ८६० इंजेक्शन मागविले असून, याची ऑर्डर २७ मे रोजी टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले.
--
डायनाप्लास दोन हजार, तर सिरपच्या १ लाख बाटल्यांची मागणी
रुग्णालयातील तुटवडा पाहता, पाच दिवसांपूर्वी दोन हजार डायनाप्लास आणि १ लाख कफ सिरपच्या बाटल्यांची मागणी करण्यात आली आहे. सध्या मात्र, इतर औषधांवरच कारभार चालविला जात आहे. यात रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळण्याचा प्रकार आरोग्य विभाग करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
---
वॉर्डमध्ये कफ सिरप दिले जात नाही. डायनाप्लास न लावता साधी पट्टी लावली जाते. यामुळे सुई निघून रक्त बाहेर येते. इतर औषधीही वेळेवर मिळत नाहीत. काही डॉक्टर बाहेरून औषधी आणायला सांगतात. यात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
अजय सुरवसे, मदत करणारा कार्यकर्ता
--
थोडाफार तुटवडा जाणवत आहे. लगेच मागणी केली आहे. तसेच लोकल लेव्हलला उपलब्ध केला जात आहे. आणखी औषधी मागविल्या जात आहेत. याबाबत सूचना केल्या आहेत.
डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड