गेवराई (जि. बीड) : मोठ्या भावाला दारूचे व्यसन होते. त्यामुळे तो व्याजाने लोकांकडून पैसे घेत होता. त्याच्या या वागण्याला कंटाळून लहान भावाने मित्रांच्या मदतीने कट रचून लाकडी दांड्याने मारहाण करून खून केला. ही घटना शहराजवळील मन्यारवाडी शिवारात रविवारी रात्री घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मनोहर विलास पुंडे (वय ३५, रा. चिंतेश्वर गल्ली, गेवराई) असे मयताचे नाव आहे. मनोहर याला दारूचे व्यसन होते. यासाठी तो दुसऱ्यांकडून नेहमी व्याजाने पैसे घेत होता. ते पैसे लहान भाऊ परत करीत असे. मोठा भाऊ नेहमीच दारू पिऊन येत घरात आई व लहान भावाबराबर भांडत असे. लहान भाऊ दर्शन पुंडे हा त्याच्या दररोजच्या या वागण्याला कंटाळला होता. अखेर त्याचा काटा काढण्याचा कट भाऊ दर्शन याने माउली बाप्ते व इतर मित्रांच्या मदतीने रचला. रविवारी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास शहराजवळील मन्यारवाडी शिवारातील महेंद्र सावंत यांच्या शेतात मनोहरला नेण्यात आले. तेथे त्याला लाकडी दांड्याने व काठीने मारहाण केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली.
लहान भाऊ दर्शन पुंडे ताब्यातपोलिस उपनिरीक्षक तुकाराम बोडखे, पोलिस हवालदार रामनाथ उगलमुगले, राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला. या प्रकरणी लहान भाऊ दर्शन पुंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, माउली बाप्ते व अनोळखी तीन अशा पाच जणांविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलिस उपनिरीक्षक तुकाराम बोडखे हे करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील इतर चार आरोपी अजूनही फरार आहेत.