बीड : नशेमुळे बेशुद्ध झालेल्या रुग्ण जिल्हा रुग्णालयात आला. त्याला बेशुद्ध अवस्थेतून ज्या डॉक्टरांनी शुद्धीवर आणले, त्यांच्यावर त्याने हल्ला चढविला. लाथा बुक्क्याने मारहाण केल्याने एक डॉक्टर व एक परिचारक विद्यार्थी जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजता अपघात विभागात घडली. तोंडी माफी मागितल्याने तक्रार देण्यात आली नसली तरी या प्रकरणाने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कर्नाटक राज्यातील काही भाविक बीड जिल्ह्यात आले होते. नेकनूर परिसरात त्यांच्यातीलच एक व्यक्ती बेशुद्ध पडला. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. अपघात विभागात दाखल करताच डॉक्टरांनी उपचार केले. फिजिशिअन डॉ.संजय राऊत यांनी उपचार करून त्याला शुद्धीवर आणले. शुद्धिवर येताच या रुग्णाने डॉ.राऊत यांच्यावर हल्ला चढविला. त्यांच्या बचावासाठी गेलेल्या परिचारक विद्यार्थ्यावरही त्याने हल्ला केला. डॉ.राऊत यांच्या पोटात व डाव्या हाताला मुका मार लागला. तर विद्यार्थ्याच्याही पोटात जोराची लाथ बसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर वॉर्ड क्रमांक पाचमध्ये उपचार करण्यात आले.दरम्यान, या रुग्णासोबत आलेले नातेवाईक व काही महाराजांनी डॉक्टरांची माफी मागितली. त्यामुळे तक्रार करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. हा गोंधळ होताच सुरक्षा रक्षक व पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी धाव घेत हा वाद मिटविला होता. हा रुग्ण नशेत असल्याने त्याने हा धुडगूस घातल्याचा दावा येथील डॉक्टरांनी केला आहे.उपचार करूनही मारहाण हे दुर्दैवजिल्हा रुग्णालयात तत्पर व वेळेवर उपचार होत नाहीत, अशी ओरड नेहमीच असते. अनेकदा रुग्ण व नातेवाईकांकडून डॉक्टर, परीचारकांना मारहाणही केली जाते. परंतु या प्रकरणात उपचार करूनही नशेत असलेल्या रुग्णाने मारहाण केली. ही घटना दुर्दैवी असल्याचे बोलले जात आहे. अपघात विभागात नशेत येणा-या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. येथे कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नियूक्त करण्याची मागणी होत आहे.
नशेबाज रुग्णाचा बीड जिल्हा सामान्य रुग्णालयात धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 11:41 PM
नशेमुळे बेशुद्ध झालेल्या रुग्ण जिल्हा रुग्णालयात आला. त्याला बेशुद्ध अवस्थेतून ज्या डॉक्टरांनी शुद्धीवर आणले, त्यांच्यावर त्याने हल्ला चढविला. लाथा बुक्क्याने मारहाण केल्याने एक डॉक्टर व एक परिचारक विद्यार्थी जखमी झाला आहे.
ठळक मुद्देभीतीचे वातावरण : डॉक्टर, शिकाऊ परिचारक विद्यार्थ्याला मारहाण