लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सुरक्षा रक्षक आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे मागील काही दिवसांपासून जिल्हा रूग्णालय परिसरात मद्यपी व टवाळखोरांची दहशत वाढली आहे. रविवारी रात्रीही एका मद्यपीने चक्क पोलीस चौकीसमोरच धिंगाणा घातला. त्यामुळे डॉक्टर, परिचारीका, कर्मचारी, रूग्ण व नातेवाईकांमध्ये भिती निर्माण झाली. हा सर्व प्रकार समोर घडत असतानाही पोलीस व सुरक्षा रक्षकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने संताप व्यक्त होत आहे.जिल्हा रूग्णालयातील सुरक्षा रक्षकांच्या कामगिरीबद्दल मागील काही दिवसांपासून असमाधान व्यक्त केले जात आहे. दोन महिन्यापूर्वीच एका डॉक्टरची गच्ची पकडली होती. त्यानंतर परिसरातील सुरक्षेकडेही या रक्षक दुर्लक्ष करतात. अस्ताव्यस्त वाहने लावले जात असल्याने रूग्णवाहिकेलाही यायला जागा राहत नाही. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही हे सुरक्षा रक्षक केवळ नातेवाईकांनाच दमदाटी करतात. आतापर्यंत त्यांच्याकडून कसलेच नियोजन झालेले दिसत नसल्याची ओरड आहे. यासंदर्भात खुद्द जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी यावर नाराज व्यक्त करीत या सुरक्षा रक्षकांबद्दल शासनाकडे तक्रारही केलेली आहे. तरीही अद्याप यात सुधारणा झाली नसल्याचे रविवारी रात्री घडलेल्या घटनेवरून दिसत आहेत. एक मद्यपी समोर धिंगाणा घालत असतानाही सर्व सुरक्षा रक्षक एका रूमध्ये बसून हा सर्व प्रकार पहात असल्याचे सूत्रांनी सांगितले. रस्त्यातच हा सर्व धिंगाणा होत असल्याने बघ्यांची गर्दी जमली होती. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.रूग्णालयाच्या सुरक्षेसाठी असलेल्या रक्षकांकडून रूग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना धक्काबुक्की केली जाते. धिंगाणा घालणाºया, तसेच दमदाटी करणाऱ्यांना हे रक्षक काहीच करीत नसल्याचे दिसून येत आहे. केवळ सर्वसामान्यांवरच हे अधिकार गाजवित असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा रक्षकांवर डॉ.थोरात काय कारवाई करतात, हे वेळच ठरवेल.
रुग्णालय पोलीस चौकीसमोरच मद्यपीचा धिंगाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:55 PM