कडा : वटणवाडी येथील दारूच्या नशेत तर्र असलेल्या 45 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी आरोग्य पथक येताच धूम ठोकल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री १० वाजेच्या दरम्यान घडली. यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी आरोग्य पथकाने कडा येथे रात्र जागून काढली मात्र त्याला ताब्यात घेण्यात यश आले नाही. संतापजनक बाब म्हणजे आरोग्य पथक रात्रभर शोध घेत असताना रुग्णाबाबत माहिती असूनही ग्रामसुरक्षा समिती आणि त्याच्या नातेवाईकाने कोणतीही मदत केली नाही.
आष्टी तालुक्यात सध्या कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रूग्ण आढळून येत असल्याने प्रशासन जेरीस आले आहे. त्यातच बुधवारी वटणवाडी येथील 45 वर्षीय पुरूष पॉझिटीव्ह आल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यासाठी ग्रामीण रूग्णालयातून आरोग्य पथकासोबत एक गाडी पाठवण्यात आली. परंतु, बाधित रुग्ण वटणवाडी येथे सापडला नाही. तो दारूच्या नशेत कडा येथे फिरत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने कडा येथे त्याचा शोध सुरु केला.
रुग्णाला सापडण्यासाठी आरोग्य विभागाने संपूर्ण रात्र जागून काढली. संतापजनक म्हणजे रुग्णाबाबत येथील ग्राम सुरक्षा समिती आणि त्याच्या नातेवाईकांना माहिती असूनही आरोग्य पथकाला कोणीच मदत केली नाही. बाधित रुग्ण दारूच्या नशेत तर्रर्र असल्याने त्याने धुम ठोकली असून अद्यापपर्यंत त्याचा शोध लागला नाही. यामुळे त्याचा संपर्क आणखी काही नागरिकांशी येऊन कोरोणा प्रसाराचा धोका निर्माण झाला आहे. ग्राम सुरक्षा समिती आणि नागरिक यांचे सहकार्य मिळत नसल्याने काही बाधित रूग्ण उपचार न घेता पलायन करत असल्याने आरोग्य विभागासमोर कोरोना नियंत्रणाचे मोठे आव्हान आहे.
आरोग्य पथकासोबत पोलीसांची गरज ग्रामपंचायत निहाय कोरोनाला अटकाव घालण्यासाठी ग्राम सुरक्षा समिती नेमली आहे. पण समितीचे आरोग्य विभागाला सहकार्य लाभत नाही. बाधित रूग्णसुद्धा पलायन करत आहेत. त्यामुळे आता आरोग्य पथकाच्या मदतीला समितीसह पोलिसांच्या एका पथकाची गरज आहे.
धोका वाढू शकतो वटणवाडी येथील बाधित रूग्ण कड्यात फिरत असल्याचे समजले. त्याला ताब्यात घेण्यासाठी पथकाची गाडी रात्रभर फिरली. पण रुग्ण हाती लागला नाही. यावेळी आरोग्य पथकाला नातेवाईक व ग्राम सुरक्षा समितीचे सहकार्य लाभले नाही. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात कोरोनाचा धोका आणखी वाढू शकतो असा इशारा कडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी दिला.