बीड : येथील जिल्हा रूग्णालयात कार्यरत डॉक्टर, परिचारीकांना धक्काबुक्की केली जात असल्याने ते दहशतीखाली काम करीत आहेत. तक्रार देऊनही बीड शहर पोलिसांकडून आरोपीला अटक न केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या आरोपींना बीड शहर पोलिसांचे अभय असल्याचा आरोपही रूग्णालय कर्मचाऱ्यांमधून केला जात आहे.
१७ एप्रिल रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास रूग्णाच्या मुलाने परिचारीकेला धक्काबुक्की करून अश्लिल शिवीगाळ केली होती. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. या घटनेला १३ दिवस उलटूनही अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. तसेच चार दिवसांपूर्वी अपघात विभागात कार्यरत असलेल्या डॉ.संजय राऊत यांना एका व्यक्तीने सर्वांसमोर शिवीगाळ केली. याची तक्रार डॉ.राऊत यांनी बीड शहर पोलिसांकडे दिली. अर्ज प्राप्त झाल्यानंतरही बीड शहर पोलिसांकडून आरोपीचा अद्याप शोध घेतलेला नाही.
तसेच रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एका मद्यपी रूग्णाने व त्याच्या नातेवाईकाने एका डॉक्टरला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. तसेच येथील रजिस्टरही फाडून फेकले. मात्र, हे प्रकरण कागदावर आले नाही. मिळालेल्या माहितीनूसार पोलीस आरोपींना पाठिशी घालत असल्यानेच या डॉक्टरने तक्रार दिली नसल्याचे सांगण्यात आले. या सर्व घटनेवरून बीड शहर पोलिसांच्या कामगिरीवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता परिचारीक व डॉक्टर हे बीड शहर पोलिसांच्या विरोधात पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सूत्रांनी सांगण्यात आले.
पोलिसांकडून आरोपीची पाठराखण?डॉ.राऊत यांनी तक्रार दिली. याच्या तपासाबाबत बीड शहर ठाण्याचे पोउपनि एस.जाधव यांना विचारले असता, त्यांनी ते डॉक्टर तक्रार देणार नाहीत, असे सांगितले. त्यानंतर डॉ.राऊत यांना विचारणा केली असता, त्यांनी आपल्याला शिवीगाळ करणाराविरोधात अर्ज दिला आहे. मी अर्ज माघारी घेणार नसल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. तक्रारदार कारवाईची मागणी करीत असताना पोलिसांकडून टाळाटाळ का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चौकशी करून कारवाई होईल जिल्हा रूग्णालयात परिचारीकांना धक्काबुक्की करणारा आरोपी लवकरच अटक केला जाईल. बीड शहर पोलिसांना आदेश दिले आहेत. तसेच तक्रार अर्जाचीही माहिती घेऊन कारवाई केली जाईल. आमचे अधिकारी, कर्मचारी आरोपींना पाठिशी घालत असतील, तर त्यांचीही चौकशी करून कारवाई केली जाईल.- जी.श्रीधर, पोलीस अधीक्षक, बीड