धारूर (जि. बीड) : येथील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रिक्षातच प्रसूती होण्याची वेळ एका मातेवर आली. बुधवारी सकाळी रुग्णालयाच्या समोर ही घटना घडली.
येथील कजबा विभागातील शहाजी उमाप यांची कन्या शारदा घनश्याम मस्के हिला प्रसूतीसाठी एका रिक्षातून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येत होते. रुग्णालयाकडे जाणारा रस्ता खराब असल्याने रिक्षात जोराचा दणका बसला. त्यामुळे रुग्णालयाच्या दाराजवळ रिक्षा पोहोचत असतानाच महिलेने पुत्ररत्नाला जन्म दिला. ही बाब समजताच वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांनी रिक्षाकडे धाव घेत माता आणि बाळाला रुग्णालयात दाखल केले.ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्याची प्रचंड दुरवस्था आहे. मोठे वाहन सोडा दुचाकी चालवणे अवघड झाले आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यावर घाण पाण्याचे डबके साचलेले आहेत. दुचाकी चालवताना दगड उडून लागतात तर पाणी अंगावर उडते. खराब रस्त्यामुळे ही वेळ आल्याचे सांगून हा रस्ता तात्काळ दुरुस्तीची मागणी महिलेचा भाऊ सुधीर उमाप याने केली आहे.
रुग्णालयाजवळ येताच रिक्षात प्रसूत झालेल्या मातेला आणि बाळाला तातडीने रुग्णालयात नेऊन डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आवश्यक सेवा दिली. दोघांची प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक चेतन आदमाने यांनी संगितले. दरम्यान, या रस्त्याची तातडीने दुरुस्तीे करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे.