अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमात सुधारणा करण्यात आली असून, आता अकृषिक जमिनीचे (एनए प्लॉट) तुकडे पाडून खरेदी-विक्री करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक राहणार आहे. यामुळे लहान बांधकामांसमोर चिंता वाढली असून, अनेक व्यवहारदेखील रखडले आहेत. दरम्यान, यामुळे कमी उत्पन्न असणाऱ्यांनाही आपल्या बजेटमधील घराचे स्वप्न साकारणे अवघड होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या असून यामुळे जमिनीचे तुकडे पाडून त्यांची खरेदी-विक्री करण्याचे प्रमाण वाढले. यापूर्वीच शासनाने जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत, तरीदेखील जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत राहिले व त्याची दस्त नोंदणीही झाली.
---------
काय आहे नवा निर्णय
त्यामुळे दुय्यम निबंधकांना दस्त नोंदणी करताना नमूद धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) अधिनियमानुसार मंजूर केलेला पोटभाग किंवा रेखांकन दस्तसोबत न जोडल्यास दस्त नोंदणी स्वीकारू नये, असे आदेश नोंदणी उपनिरीक्षकांनी दिले आहेत. त्यामुळे आता जमिनीचे तुकडे पाडून लहान बांधकामे होणे अवघड होणार असल्याने अनेक बांधकाम व्यावसायिकांसमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत.
स्वप्नातील घर कसे साकारणार ?
रोजगारानिमित्त शहरांमध्ये अनेक जण आले असून, अनेकांनी स्वतःचे घर साकारण्यासाठी लहान प्लॉट घेण्याचे नियोजन केले. त्यात गेल्या अनेक वर्षांपासून जळगावसारख्या लहान शहरात मोठा प्लॉट घेणे शक्य होत नसल्याने अनेक जण एक प्लॉट दोन जण मिळून घेतात व त्यावर बांधकाम करतात. मात्र, आता यात अडचणी येत असल्याने मध्यमवर्गीयांनी स्वप्नातील घर कसे साकारावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पूर्वीप्रमाणेच परवानगी हवी
तुकडाबंदीने लहान घर घेणाऱ्यांना अडचणी येण्याची शक्यता असून, आतापासून त्याच्या खरेदी-विक्रीत अडथळे येत आहेत. बजेटमधील घरासाठी अनेकांकडून लहान-लहान प्लॉटला पसंती असते. याचा विचार करून लहान प्लॉटचे व्यवहार पूर्वीप्रमाणेच होऊ देण्याची परवानगी मिळणे आवश्यक आहे. - अनिल तोडीवले, बांधकाम व्यावसायिक, अंबाजोगाई.
एखाद्या प्लॉटसाठी अगोदरच बिनशेती परवानगी घेतलेली असल्यास त्याच्या खरेदी-विक्रीसाठी पुन्हा परवानगीची आवश्यकता नसावी. नोंदणी कार्यालयात दिशाभूल केली जात असून, कृषक व अकृषक याविषयी योग्य खुलासा झाल्यास सर्वांना माहिती मिळू शकेल. - शेख शकील, बांधकाम व्यावसायिक, अंबाजोगाई.
मोठ्या जागेसाठी पैसा आणावा कोठून?
घराचे भाडे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे लहान प्लॉट घेऊन स्वतःचे घर बांधण्याचे नियोजन केले. मात्र, आता एक प्लॉट दोन जणांना घेता येत नसल्याने स्वतःचे घर कसे होऊ शकेल? अशी चिंता आहे. सामान्यांचा विचार व्हावा. - प्रशांत सेलमुकर, नागरिक, अंबाजोगाई.
नोकरीनिमित्त शहरात आलो. येथे स्वतःचे घर असावे म्हणून जागाही शोधली. मात्र, आपल्याला परवडेल, अशा किमतीत प्लॉट घेण्यास आता अडचणी येत आहेत. मोठा प्लॉट घेणे शक्य नसल्याने घराचे स्वप्न धूसर होऊ पाहत आहे. - गणेश गवळी, नागरिक.