बीड : मागील चार दिवसांपासून थंडी गायब झाल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे तूर उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. यातच रविवारी झालेल्या तुरकळ सरींमुळे अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकºयांनी साधी फवारणी केल्यास उत्पादनातील घट टाळता येणार आहे. दरम्यान, ज्वारीसाठी हे वातावरण फायद्याचे असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले.
चार दिवसांपासून थंडी नसल्यासारखीच आहे. ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवत आहे. याचा बहरात आलेल्या तुरीला फटका बसेल की काय? याची चिंता शेतकºयांना लागली आहे. जिल्ह्यात ४० हजार हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड झाली असून, दमदार पावसामुळे तुरीचे पीक जोमात आहे. परंतु ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळीचा प्रादुर्भाव होतो. शेंगा पोखरणा-या या अळीमुळे पिकांना फटका बसू शकतो, त्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते. तुरीबरोबरच पालेभाज्यांच्या पिकांनाही फटका बसू शकतो. तसेच फळबागांनाही नुकसानीस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. विशेषत: तूर सोडल्यास कीड रोगाचा इतर रोगांना धोका नसल्याच कृषीक्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
तुरीची उंची वाढल्यामुळे फवारणीवेळी शेतकºयांनी काळजी घ्यावी, आवश्यक उपाय करावेत, फवारणीबाबत कृषी विभागाने मागील आठवड्यापासून पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. कमीत कमी औषधाची साधी फवारणी केल्यास अळीचा प्रादुर्भाव व उत्पादनातील घट देखील टाळता येईल, असे कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी व्ही.एन. मिसाळ म्हणाले.