दिवसेंदिवस अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अंबाजोगाई तालुक्यात एप्रिल महिन्यात आतापर्यंत ३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित निघाले आहेत. गावोगावी संसर्ग वाढत चालला आहे. आजपर्यंत अंबाजोगाई तालुक्यात ७ हजारांच्या जवळ कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली आहे. अजूनही संसर्ग वाढत चालल्याने ग्रामीण भागातही कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होऊ लागली आहे. कोरोना महामारी आता प्रत्येकाच्या दारापर्यंत आल्याचे दिसून येत आहे. अशा गंभीर परिस्थितीत गर्दी, तसेच अधिक लोकसंख्येच्या गावात व शहरांमध्ये लोकांपुढे कसलाच पर्याय राहिला नाही. त्यांना नाईलाजाने आपआपल्या घरातच राहावे लागत आहे. मात्र, खेड्यापाड्यात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबांनी आता आपला मोर्चा शेताकडे वळविला आहे. त्यामुळे इतर लोकांच्या संसर्गापासून दूर निसर्गरम्य मोकळ्या अशा वातावरणात राहता येते तसेच शेतातील उन्हाळी मशागतीची कामेही करता येतात. या हेतूने अंबाजोगाई तालुक्यातील गावोगावी अनेक शेतकरी कुटुंबांनी आपल्या शेतातच मुक्काम ठोकल्याचे चित्र दिसून येत आहेत.
आरोग्याला पूरक वातावरण
सध्या ग्रामीण भागात उसाला पाणी देणे, कोळपणी, नांगरणी, काटेरी झुडुपे तोडून साफसफाई करणे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी नांगरटीचे कामे चालू आहेत. या कोरोना साथरोगाच्या संक्रमणाला रोखण्यासाठी आपल्या शेतीमध्ये काही दिवसांसाठी का होईना? वास्तव्य करून राहणे हे आता आपले आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी सोयीस्कर ठरत आहे. हे गमक ग्रामीण भागातील नागरिकांना सापडल्याने शेतात वास्तव्य करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.