- प्रभात बुडूख
बीड : जिल्ह्यातील सर्वच महसूली मंडळामध्ये सरासरीपेक्षा अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. दुष्काळाच्या झळा ऐन पावसाळ््यात देखील जाणवत असल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी ज्याप्रकारे टँकर सुरू ठेवले, त्याचप्रमाणे चारा छावण्या पुन्हा सुरू करण्याची मागणी आष्टी तालुक्यातून होत आहे.
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे ६०० पेक्षा अधिक चारा छावण्या सुरू केल्या होत्या. त्यापैकी बीड व आष्टी तालुक्यात सर्वाधिक छावण्या होत्या. जून महिन्यात तुरळक झालेला पाऊस व शेतातील मशागतीच्या कामामुळे शेतकऱ्यांनी छावणीवरील जनावरे घरी नेली. कमी जनावरांसाठी छावणी परवडत नाही म्हणून बहूतांश चालकांनी छावण्या बंद केल्या आहेत. सुरुवातीला सुरु झालेल्यांपैकी ११ चारा छावण्या सुरु असून त्यामध्ये ८ हजार ५९७ जनावरे आश्रयास आहेत.
निम्मा जुलै संपला असताना देखील पावसाने ओढ दिली आहे. अनेक ठिकाणी तुरळक पावसामुळे थोड्याफार प्रमाणात चारा उपलब्ध झाला आहे. मात्र, तो देखील जनावरांच्या तोंडाला लागत नसल्यामुळे त्याचा उपयोग होत नाही. तसेच पाणी प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चारा छावणी सुरू करण्याची मागणी आष्टी तालुक्यातून झाली. याला प्रतिसाद देत जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव मागवले आहेत. बुधवारपर्यंत आष्टी तालुक्यातून ३३ छावण्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते तर ३४ प्रस्ताव येणार असल्याचे समजते.
देयके न मिळाल्यामुळे छावणी चालक निरुत्साहीआष्टी तालुक्यातील प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत, जी परिस्थिती आष्टी तालुक्यात आहे, अशाच प्रकारे इतर तालुक्यात देखील पावसाची परिस्थिती आहे.मात्र, चारा छावणी सुरु करण्यासाठी इतर तालुक्यातील छावणी चालक उत्साही दिसत नाहीत. मागील काळातील छावण्यांची देयके अद्याप मिळाली नसल्यामुळे आर्थिक कोंडी झाली आहे. तसेच काही चारा छावणी चालकांनी केलेल्या गैरव्यवहाराची शिक्षा सरसकट सर्वच छावणी चालकांना मिळत असल्याने पुन्हा चारा छावणी सुरु करण्यास ते निरुत्साही असल्याचे सांगण्यात आले.
छावण्याची सद्यस्थिती तालुका सुरु जनावरांची संख्याबीड १ ६९५आष्टी ३ २३९८ वडवणी १ ६७८गेवराई ६ ४८२६एकूण ११ ८५९७
सर्व परिस्थितीचा संबंधित उपविभागीय अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांकडून अहवाल घेतला जाईल, चारा छावण्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. चारा उपलब्ध नसेल तर मंजुरी देण्याच्या संदर्भातील निर्णय घेतला जाईल. - रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी बीड