अंबाजोगाई : शौचालय नसल्याने तालुक्यातील चिचखंडी येथील महिला सरपंच संगीता नवनाथ होके यांचे सरपंच पद रद्द झाले. तसा निकाल जिल्हाधिकारीबीड यांनी दिला.चिंचखंडी येथील ग्रामपंचायत निवडणूक ६ आॅक्टोबर २०१७ रोजी झाली. यावेळी सविता होके व संगीता होके यांच्यात लढत होऊन संगीता होके या सरपंच म्हणून निवडून आल्या. संगीता होके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांकडे छाननीच्या वेळी सविता होके यांनी आक्षेप नोंदवला. संगीता या ज्या घरात राहतात त्या ठिकाणी शौचालय नाही. परंतु संगीता यांनी भाडेपत्र व शौचालय असल्याचे शपथपत्र, घरमालक यांच्याकडे शौचालय असलेले ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र दाखल केले. म्हणून आक्षेप अर्ज फेटाळला.याबाबत उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाद मागितली असता उच्च न्यायालयाने अर्जदारास जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागण्याचे सुचविल्यानुसार अर्जदाराने जिल्हाधिकाºयांकडे अपील क्र.२८/२०१७ दाखल केले. चिंचखडी येथील अर्जदार सविता भाऊराव होके यांनी सरपंच संगीता नवनाथ होके या मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१),(ज-५) व १६ मधील तरतुदीनुसार शौचालयाचा नियमित वापर करीत नसल्याने त्यांचे सरपंच पद रद्द करण्याबाबत ८ नोव्हेंबर २०१७ रोजी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.या प्रकरणाची सुनावणी जिल्हाधिकाºयांकडे झाली असता सरपंच संगीता होके या अभिमान होके यांच्याकडे किरायाने राहत असून त्याठिकाणी संयुक्त शौचालय वापरत असल्याचे व सरपंच संगीता होके यांच्याकडे स्वतंत्र शौचालय नसल्याचे सिद्ध झाल्यामुळे अर्जदार सविता होके यांचे अपील मंजूर करून सरपंच संगीता नवनाथ होके (रा. चिंचखडी ता. अंबाजोगाई) यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियमचा भंग केला. त्यामुळे त्यांचे सरपंचपद अपात्र करण्यात आल्याचा निर्णय ६ नोहेंबर २०१९ रोजी दिला. सदरील निकालामुळे ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.
शौचालय नसल्याने चिंचखंडीच्या महिला सरपंचाचे पद केले रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:10 AM
शौचालय नसल्याने तालुक्यातील चिचखंडी येथील महिला सरपंच संगीता नवनाथ होके यांचे सरपंच पद रद्द झाले. तसा निकाल जिल्हाधिकारी बीड यांनी दिला.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा निकाल : ग्रामपंचायत अधिनियमचा भंग