पाटोदा (बीड ) : पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील ५० हजार हेक्टरमधील खरिपाची पिके वाया गेली आहेत. १० ते २० टक्के उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती पडेल अशी स्थिती आहे. तालुक्यातील प्रमुख १४ सिंचन आणि साठवण तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.
यंदा शेतकऱ्यांच्या हाती पीक लागणार नाही तर दुसऱ्या बाजूस चारा -पाण्यामुळे पशुधन ही धोक्यात आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक निवडणुका जिंकण्याचे आखाडे बांधण्यात मग्न आहेत. विरोधी पक्षाचे लोक सत्ता मिळवण्यासाठी राजकारण करत आहेत तर प्रशासन सुस्त असल्याने सामान्य शेतकऱ्यांनी दाद कोणाकडे मागावी असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
गतवर्षी भर पावसाळ्यात पावसाने दडी मारली. अखेरच्या टप्प्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले. यंदा सुरुवातीच्या काळात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी पेरता झाला. गतवर्षी बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनवर भर दिला. पावसाने दडी मारल्याने सोयाबीनसह सर्वच खरीप पिके वाया गेली आहेत. झालेल्या रिमझिम पावसात मोठ -मोठे खंड पडल्याने पिकांवर विपरीत परिणाम झाला. सोयाबीनच्या शेंगांची पापडी झाली. तूर आणि कापूसची उंची वाढली नाही. थोडेफार आलेले पाते गळून पडले. पाणी मिळालेल्या कापसावर लाल्या आणि बोंडअळीने हल्ला चढवला.
शेतकरी, शेतमजूराच्या हाताला कामं नाही, रोजगार नाही, उत्पन्न नाही. अशा स्थितीत जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झालेला आहे.पावसाच्या अवकृपेमुळे यंदा ऊसतोडीसाठी जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे मुकादम लोकांनी उचल द्यायला हात आखडता घेतला आहे.गतवर्षी १५ सप्टेंबर पर्यंत तालुक्यात ६७०.०३ मि. मी. एवढा पाऊस झाला होता. यंदा केवळ २९७.०५ मि. मी. एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे.तालुक्यातील सध्या असलेल्या पाण्याची साठवण आणि पिकांची स्थिती पाहता महसूल प्रशासनाकडे असलेली आकडेवारी असत्य ठरत आहे. तालुक्यातील प्रमुख १४ सिंचन आणि साठवण तलाव येत्या काही दिवसांत कोरडेठाक पडणार आहेत. त्यामुळे शासनाने वेळीच उपाययोजना करावी, अशी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सोयाबीनला प्राधान्य : खरीप पेरा वाढलाखरीप हंगामात पेरणी झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५ हजार हेक्टर क्षेत्र वाढले. सरासरी ४४ हजार २६९ एवढं खरीपाच क्षेत्र आहे. यंदा ४९ हजार १५० हेक्टरवर पेरा झालेला आहे.सर्वाधिक २१ हजार ९१३ हेक्टरवर सोयाबीन पेरा झाला आहे. इतर पीकपेरा असा : कापूस - १२ हजार ५०६, बाजरी ४ हजार २६३, तूर ३ हजार ३२८, उडीद ४ हजार ८२४, मूग १ हजार ३३७, मका १७३, कारळ १५४, सूर्यफूल ५०, तीळ ९०, भुईमूग १५५, मटकी ११५, एरंडी ८९ आणि इतर तृणधान्य २०३ हेक्टर याप्रमाणे पीकनिहाय पेरणी झाली.
दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणीतालुक्यातील पिकांची स्थिती अतिशय वाईट आहे. जवळपास ८० टक्के पेरा नापीक झाला आहे. पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून आणि तलावातील पाण्याची मोजदाद करून करून ताबडतोब पंचनामे करावेत आणि तालुका दुष्काळी जाहीर करावा अशा मागणीचे निवेदन राजाभाऊ देशमुख, गणेश कवडे, चक्रपाणी जाधव, विष्णूपंत घोलप, उमर चाऊस, किशोर भोसले, नामदेव सानप, गणेश शेवाळे यांनी तहसीलदारांना दिले आहे.