कडा : येथील नदीवर मारुती मंदिराजवळील कोल्हापुरी बंधाऱ्यावर गेट व्यवस्थित न बसल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात वाया गेले आहे. दोन कोटी रुपयांच्या या बंधाऱ्याला तब्बल ८० लाख रुपये खर्च करून शासनाने हायड्रोलिक गेट बसवले आहेत. मात्र, त्यामधून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती झाली असून, आता हा बंधारा केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कोरडाठाक पडला आहे.
ही पाणी गळती थांबविण्यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी केली होती.
कडा येथे २०१२ साली तत्कालीन आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नातून कडी नदीवर मारुती मंदिराजवळ दोन कोटी रुपये खर्च करून शासनाने कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा केला आहे. या बंधाऱ्यात पाणी साचल्यामुळे गावातील पाणी प्रश्न सुटणार आहे. तसेच परिसरातील शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन शेतकरीवर्गाला फायदा होणार आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले. मात्र, या दरवाजामधून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत होती. ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना पाणी गळती थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. परंतु या अधिकाऱ्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. परिणामी फेब्रुवारी महिन्यातच कोट्यवधी लीटर पाणी साठवणुकीचा बंधारा कोरडाठाक पडला आहे. पाणी गळती झाली नसती तर हे पाणी आणखी किमान तीन महिने टिकले असते.
कडा परिसरात गेल्या तीन वर्षांपासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणावर सहन केल्या आहेत. मात्र, यावर्षी निसर्गाने भरभरून देत नदी तुडुंब भरून वाहिली आहे. यात कडा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्याच्या गेटमधून पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांना या पाण्याचा कवडीचाही उपयोग झाला नाही. यातील दोषी अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
याबाबत आष्टी येथील लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता देवेंद्र लोकरे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आम्ही लिकेज काढले होते. त्याचे फोटोदेखील आमच्याकडे असल्याचे त्यानी सांगितले.
===Photopath===
260221\26bed_1_26022021_14.jpg