माजलगाव : मंगळवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसात शेतकºयांचा शासकीय खरेदी केंद्रावररील जवळपास वीस हजार क्विंटल हरभरा भिजल्याने मोठे नुकसान झाले. बाजार समितीमुळेच शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप खरेदी केंद्रावरील शेतक-यांनी केला आहे. नुकसानग्रस्तांनी काही वेळ गोंधळ घालून गोदामाकडे जाणा-या ट्रक अडवल्याने वातावरण तंग झाले.
२९ मे रोजी शासनाने हरभरा खरेदी बंद केली असताना शेवटच्या दिवशीपर्यंत गोदामाअभावी साडेआठ क्विंटल तूर पडून होती. तसेच मापे झालेला हरभरा १३ हजार क्विंटल आणि मापाविना पडून असलेला शेतक-यांचा वीस हजार क्विंटल हरभरा पडून होता. मंगळवारी पहाटे तीन वाजेपासून माजलगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे हरभरा भिजल्याने मोठे नुकसान झाले.
पोते पाण्यावर तरंगत असल्याने व हरभ-याच्या चक्क घुगºया झाल्याने शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आले होते. बाजार समितीने व्यापाºयांच्या मापाला प्राधान्य दिल्याने शेतकºयांची मापे झाली नाहीत, असा आरोप नुकसानग्रस्त शेतकºयांनी करत एकच गर्दी केली होती. दुसरीकडे बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक खरेदी केंद्रावर आले होते. त्यांनी तात्काळ मालट्रक, हमाल लावून तेथील तूर, हरभºयाची पोती गोदामात हलविण्यास सुरुवात केली होती. यावेळी काही संतप्त शेतकºयांनी गोंधळ घालून या ट्रक अडविल्याने काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी शिवसेनेचे आप्पा जाधव हे काही शेतकºयांना घेऊन खरेदी केंद्रावर आले. त्यांनी बाजार समिती पदाधिका-यांना धारेवर धरले.आ. देशमुख यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्षबाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने वेळेवर बारदाना, गोदाम उपलब्ध करून देण्यासाठी आमदार आर.टी. देशमुख यांनी लक्ष दिले नाही. विरोधी पक्षाच्या ताब्यातील बाजार समितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने वीस हजार क्विंटल हरभरा भिजून शेतकºयांचे मोठे नुकसान झाल्याचे काही शेतकºयांनी सांगितले.