गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील गोळेगाव रोडवरील शिवारात बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास वीजतारांमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे आठ एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून वीज वितरण कंपनीने याची तात्काळ दखल घेऊन पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गेवराई पालिका आणि बाजार समितीच्या अग्नीिशामक दलाच्या गाडीने ही आग विझवली.
दादासाहेब आश्रुबा चव्हाण यांचा ग. नं. २५ ऊस क्षेत्र ४ एकर, तर अंकुश आश्रुबा चव्हाण ग.नं. २५ क्षेत्र ४ एकर जळून खाक झाला. मळ्याची काळी कसदार जमीन, मुबलक पाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस लागवड क्षेत्र आहे. या भागात विहीर आणि उजव्या कालव्याच्या काठावर अनेक विद्युत पंप असल्यामुळे तारांचे जाळे पसरलेले आहे. तारा जीर्ण झाल्यामुळे खाली आल्या आहेत. शिवाय, अनेक रोहित्रांवर जुने फ्युज आणि इतर सामान असल्यामुळे अनेकदा शार्टसर्किट होते. मंगळवारी अचानक उसातून धूर आणि ज्वाला बाहेर पडू लागल्या. तेव्हा परिसरातील शेतकरी जमा झाले. मात्र, आगीची दाहकता जास्त असल्यामुळे आग आटोक्यात आणता आली नाही. ऊस आणि उसाचे पाचट लवकर पेट घेते. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वर्षभर सांभाळून ठेवलेला ऊस जळून खाक झाला. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या टोपल्या कमी प्रमाणात असल्याने आणखी ऊस फेब्रुवारी महिना सुरू झाला तरीसुद्धा ऊस शिल्लक राहिले आहेत, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत.
साठ एकर ऊस जवळपास जळाला असता मात्र गेवराई येथील नगर परिषद आणि मार्केट कमिटीच्या अग्निशामन दल गाड्या घटनास्थळी लवकर आल्याने उसाला लागलेली आग आटोक्यात आणली.