सोमनाथ खताळ, लोकमत न्यूज नेटवर्क, बीड ( Marathi News ): बीडच्या दिवाणी न्यायालयातील एका प्रकरणाच्या निकाल पत्रातील सहा पाने बदलल्याचा प्रकार २४ डिसेंबर रोजी उघड झाला होता. संबंधित शेतकऱ्यांना मावेजा न दिल्याने बीड जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त केली जाणार होती. परंतु, ही कारवाई टाळण्यासाठी कलेक्टरने न्यायालयाला पत्र दिले. सहायक सरकारी वकिलांनी याची तपासणी केल्यानंतर यातील पाने बदलल्याचे उघड झाले. यासंदर्भात न्यायालयानेच वर्षभर चौकशी केली. त्यानंतर तक्रार दिली. आता पोलिसांचे पथक चौकशीसाठी न्यायालयात ठाण मांडून आहे.
गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील पाझर तलावात पाच शेतकऱ्यांची जमीन गेली होती. त्याची नुकसानभरपाई मिळावी यासाठी न्यायालयात धाव घेतली. २ जुलै २०१६ रोजी या शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला. त्यांना मावेजा देण्याचे आदेश झाले. परंतु, २०२२ पर्यंत तो देण्यात आला नाही. म्हणून बीड जिल्हाधिकारी यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश झाले.
ही कारवाई टाळण्यासाठी बीडच्या भूसंपादन विभागाने न्यायालयात अर्ज केला. त्यानंतर सहायक सरकारी वकील बी.एस. राख यांनी ही कागदपत्रे आणि ऑनलाइन निकाल पाहिला. त्यात त्यांना तफावत आढळली. त्यांनी रेकॉर्ड रूममधून या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे जप्त केली.
कोण संशयाच्या भोवऱ्यात?
न्यायालयाचे सर्व निकाल रेकाॅर्ड रूममध्ये असतात. येथे एक लिपिक आणि रेकॉर्ड किपर असे कर्मचारी असतात. वकिलाने, अर्जदाराने किंवा संंबंधित व्यक्तीने नक्कल पाहण्यासाठी अर्ज केल्यावर त्यांना तो दाखविला जातो. या प्रकरणातही असेच झाल्याचा संशय आहे. या मूळ प्रती पाहत असतानाच पाने बदलण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे वकील, २०१६ ते २०२२ यादरम्यानचे रेकॉर्ड किपर, लिपिक यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. या सर्वांची चौकशी न्यायालयाकडून सुरू आहे.
या प्रकरणात न्यायालयात जाऊन सर्व माहिती घेत आहोत तसेच कागदपत्रे देण्यासाठी न्यायालयाला पत्रही देणार आहोत. यात कोण दोषी, हे लवकरच समोर येईल. - अमोल गुरले, सहायक पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर पोलिस ठाणे