लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : वाल्मीक कराड, विष्णू चाटे यांनी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला २९ नोव्हेंबर २०२४ रोजी खंडणी मागितली. तेव्हा तक्रार दिली असती, ६ डिसेंबरला कंपनीच्या कार्यालयात मस्साजोग येथे गोंधळ झाला नसता. तेव्हाही पोलिसांनी आरोपींवर कारवाई न करता चहापान केले. कराडचे नाव गुन्ह्यात येण्यासाठीही ३६ दिवसांचा वेळ लागला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठीही सरकारने ७३ दिवस उशीर केला.
विष्णू चाटे याने २९ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘आवादा’चे अधिकारी सुनील शिंदे यांना कॉल केला. चाटेच्या मोबाइलवरून कराड बोलला. त्याच दिवशी सुदर्शन घुलेने कार्यालयात जाऊन खंडणी मागितली. परंतु शिंदे यांनी नकार दिला. त्यानंतर ६ डिसेंबरला घुलेसह त्याची टोळी मस्साजोगला गेली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सरपंच देशमुख यांना बोलावले.
कोठे, काय उशीर झाला?
२९ नोव्हेंबर २०२४ : पहिल्यांदा खंडणी मागितली तेव्हा आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दिली नाही.
६ डिसेंबर : भांडण झाल्यानंतर पोलिसांनी ॲट्रॉसिटी कलम लावले नाही.
९ डिसेंबर : अपहरण झाल्यानंतर गुन्हा दाखल करून घेण्यास उशीर झाला.
१० डिसेंबर : या प्रकरणात विष्णू चाटे याचे नाव घेण्यास उशीर.
११ डिसेंबर : वाल्मीक कराडसह इतरांवर खंडणीचा गुन्हा उशिराने दाखल.
३१ डिसेंबर : कराड सीआयडीला शरण.
१४ जानेवारी २०२५ : उशिराने वाल्मीक कराडचा हत्या प्रकरणात समावेश.
४ मार्च २०२५ : धनंजय मुंडे यांचा उशिराने मंत्रिपदाचा राजीनामा.
पुरावा चाटेने केला नष्ट
इतर काही महत्त्वाचे पुरावे हे विष्णू चाटे याच्या मोबाइलमध्ये होते. परंतु तो फरार असताना त्याने हा मोबाइल फेकून देत महत्त्वाचा पुरावा नष्ट केल्याचा दावा सीआयडीने दोषारोपपत्रात केला आहे.