संजय खाकरे
परळी : कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत शासनाच्या मोफत शिवभोजन थाळीमुळे परळीत गरजू हजारो नागरिकांच्या पोटाला आधार मिळाला आहे. हे शिवभोजन १५ जूनपर्यंत चालू राहणार आहे.
वैद्यनाथ मंदिराजवळील श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने १ एप्रिल २१ ते ८ जून २१ दरम्यान सहा हजार ४५४ नागरिकांना शिवभोजन थाळीचे जेवण देऊन भूक भागवली आहे. तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीनेही कोविड रुग्णांना श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून भोजन देण्यात आले आहे, असे एकूण शंभर दिवसांत १५,२०३ जणांना श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली. कोरोना काळात शासनाचे निर्बंध असल्याने नागरिकांची व रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी मोफत शिवभोजन थाळीचा नागरिकांना आधार झाला आहे. वैजनाथ मंदिराच्या दर्शनासाठी परगावाहून येणाऱ्या भक्तांची प्रसाद भोजनाची सोय व्हावी म्हणून आठ वर्षांपूर्वी अनिल लाहोटी, कचरूलाल उपाध्याय, संजय स्वामी, उमेश टाले, शिवराज उदगीरकर व इतर सदस्यांनी एकत्र येऊन श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून भोजन उपक्रम सुरू केला.
कोरोनाकाळातही गेल्या दोन महिन्यांत या चॅरिटेबल ट्रस्टने मंदिर परिसर, रामनगर, आंबेवेस, नेहरू चौक येथील निराधारांना दोन वेळेचे जेवण मोफत पुरविले आहे. तसेच शिवभोजन थाळीही उपलब्ध करून दिली आहे. नाथ प्रतिष्ठानला कोविड रुग्णांसाठी जेवण तयार करून दिले आहे, अशी माहिती अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टचे समन्वयक राकेश चांडक यांनी दिली. होम क्वाॅरंटाइन असलेल्या रुग्णांनाही श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दहा दिवस घरपोच भोजन देण्यात आले. त्यासाठी अशोक गौड, संतोष साबणे, सागर शहाणे, अतुल बारटक्के यांनी सेवा दिली.
याशिवाय राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या पुढाकाराने नवकिरण सुशिक्षित बेरोजगार संस्थेच्या शिवभोजन थाळी केंद्राने गेल्या महिनाभरात पाच हजार लोकांना जेवणाची सोय केली. तर, मार्केट परिसरात मनजीत सुगरे यांच्या श्वास प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवभोजन केंद्रावर सात हजार पाचशे लोकांना भोजनाची सोय केली. तसेच शहरातील बस स्टँड, रेल्वे स्टेशन येथेही शिवभोजन थाळी जेवणाची सोय शासनामार्फत करण्यात आली होती. या शिवभोजन थाळीचा गेल्या दोन महिन्यांत हजारो गरजूंना फायदा झाला.
भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानमार्फत येथील आयसोलेशन (विलगीकरण) सेंटरमधील रुग्णांना दररोज मोफत भोजन व्यवस्थेंतर्गत शहरातील चारशेहून अधिक कोरोनाबाधित कुटुंबांना प्रतिष्ठानमार्फत महिनाभर दोन वेळा घरपोच भोजन एकूण १५ हजार टिफीन देण्यात आले. त्यासाठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते दररोज मेहनत घेत होते.
- राजेंद्र ओझा. शहर उपाध्यक्ष, भाजप परळी
===Photopath===
100621\img-20210609-wa0268_14.jpg~100621\img-20210609-wa0256_14.jpg